Fri, Sep 20, 2019 22:30होमपेज › Nashik › किसान सन्मानचा निधी  अन्य खात्यात वर्ग करू नये

किसान सन्मानचा निधी  अन्य खात्यात वर्ग करू नये

Published On: Mar 01 2019 1:33AM | Last Updated: Feb 28 2019 11:02PM
नाशिक : प्रतिनिधी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएफ किसान) योजनेतंर्गत प्राप्त निधी हा लाभार्थीच्या नावाने बँकेत जमा झाल्यानंतर तो कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यात वर्ग होणार नाही. याबाबतचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत. त्यानंतरही एखाद्या बँकेने पैसे परस्पर वर्ग करून घेतल्यास शेेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

पंतप्रधान किसान योजनेचा निधी हा अन्य खात्यात वर्ग करू नये, असे आदेश यापूर्वीच सरकारने संबंधित यंत्रणा व बँकांना दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांची रक्कम कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत प्रशासनाने कडक पावले उचलत जिल्ह्याच्या अग्रणी बँक अधिकार्‍यांकडे विचारणा केली. यावर संंबंधित शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधत त्यांना रक्कम पुन्हा शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना दिल्याची माहिती अधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. काही शेतकर्‍यांच्या नावातील तांत्रिक चुकांमुळे बँकेत जमा केलेली रक्कम एनपीसीआयमार्फत परत काढण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून लाभार्थी एकच असल्याबाबत खात्री करून संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यामुुळे शेतकर्‍यांच्या खात्यातून परत गेलेली रक्कम पुन्हा जमा केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. 

वन कायद्याअंतर्गत पट्ट्यांचे वाटप करण्यात आलेले परंतु सातबारा सदरी नाव नसलेले वनपट्टाधारक शेतकरीदेखील योजनेस पात्र आहेत. याबाबतच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना अद्याप पट्ट्यांचे वाटप झाले नाही अशांना पट्टयांचे वाटप झाल्यावर लाभ देण्यात येईल. योजनेबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी 0253-2317151 किंवा 2315080 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.