होमपेज › Nashik › उत्तर महाराष्ट्र कोरडाठाक

उत्तर महाराष्ट्र कोरडाठाक

Published On: May 16 2019 2:09AM | Last Updated: May 16 2019 12:31AM
नाशिकरोड : वार्ताहर

नाशिक विभागातील दुष्काळाच्या झळा अतितीव्र झाल्या असून, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांत अवघा 16 टक्के पाणीसाठा उरला आहे. विभागातील 54 पैकी 44 तालुक्यांतील 895 गावे टंचाईग्रस्त असून, पैकी 41 तालुक्यांतील भूजल पातळीत 1 ते 2 मीटरने, तर 7 तालुक्यांतील भूजल पातळीत तब्बल 2 ते 3 मीटरने घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.   

विभागात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असून, धरणांमधील पाणीसाठा घटला आहे. अन्य जलस्रोतही कोरडेठाक पडले आहेत. विभागात केवळ 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वांत कमी 6.69 टक्के, त्या खालोखाल जळगावमध्ये 12.22 टक्के, नाशिकमध्ये 14.69 टक्के, धुळे जिल्ह्यात 16.64 टक्के, तर नंदुरबारमध्ये 27.20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या भूजल तपासणी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, विभागातील 54 पैकी 44 तालुक्यांतील 895 गावे टंचाईग्रस्त घोषित झाली आहेत. 41 तालुक्यांतील भूजल पातळीत 1 ते 2 मीटरने, तर 7 तालुक्यांतील पातळीत 2 ते 3 मीटरने घट झाली आहे. जूनच्या मध्यात पाऊस न पडल्यास 1972 च्या दुष्काळापेक्षाही भयानक परिस्थिती ओढावण्याची भीती जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत समाविष्ट असणार्‍या एकूण 300 पाणलोट क्षेत्रांत शासनातर्फे दर पाच वर्षांनी ऑक्टोबर, जानेवारी व एप्रिल या तीन महिन्यांत सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार 2018-2019 या कालावधीसाठी तीन टप्प्यांमध्ये संभाव्य टंचाई कार्यक्रम आखण्यात आला. यातील दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत मार्च 2019 मधील पाण्याच्या पातळीशी तुलना करता, नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यांत 1 ते 2 मीटरने, तर सिन्नर व मालेगाव तालुक्यात 2 ते 3 मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. तिसर्‍या टप्प्याचे (एप्रिल ते जून) काम शासकीय पातळीवर सुरू आहे. विभागातील 54 पैकी 49 तालुक्यांतील 1,579 गावांचा समावेश संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांत करण्यात आला आहे.

भूजल पातळीतील घट 

नाशिक :   दिंडोरी, देवळा, त्र्यंबक, नाशिक (0-1 मीटर) इगतपुरी, चांदवड, पेठ, सुरगाणा, कळवण, येवला (1-2 मीटर), नांदगाव, बागलाण, सिन्नर, मालेगाव   (2-3 मीटर)
धुळे  : शिंदखेडा, शिरपूर (1-2 मीटर), धुळे, साक्री    (2-3 मीटर)
नंदुरबार  : नवापूर, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा,  (0-1 मीटर)
जळगाव : चाळीसगाव, रावेर, भडगाव, पाचोरा, जामनेर, पारोळा, अमळनेर, एरंडोल, बोदवड, जळगाव, भुसावळ  (1-2 मीटर), मुक्ताईनगर    (2-3 मीटर), यावल  (3 मीटर)
अहमदनगर :  शेवगाव, कोपरगाव, राहाता, पारनेर  (0-1 मीटर)
श्रीगोंदा, संगमनेर, जामखेड, कर्जत, राहुरी  (1-2 मीटर), पाथर्डी  (2-3 मीटर)