Fri, Sep 20, 2019 21:31होमपेज › Nashik › पगार महापालिकेचा; कामकाज भलतीकडेच

पगार महापालिकेचा; कामकाज भलतीकडेच

Published On: Mar 13 2019 1:42AM | Last Updated: Mar 13 2019 1:42AM
नाशिक : प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. मनपाचा एक कर्मचारी गेल्या दहा वर्षांपासून हजेरी मस्टरवर केवळ स्वाक्षरी करून अन्यत्र काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित कर्मचार्‍याची नियुक्‍ती महापौरांच्या रामायण निवासस्थानी येथे आहे. परंतु, याची खबर महापौरांनाही नाही की नगर सचिव गोरखनाथ आव्हाळे यांनाही. यासंदर्भात मनपा आस्थापना विभागाचे उपआयुक्‍त महेश बच्छाव आणि आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रार करून त्या कर्मचार्‍याकडून दहा वर्षांपासूनच्या वेतनाची व्याजासह वसुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनपा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी या प्रकरणी आयुक्‍तांकडे पुराव्यांसह तक्रारच दाखल केली आहे. मनपाचे लघुलेखक रवींद्र सोनवणे असे त्या कर्मचार्‍याचे नाव आहे. सोनवणे हे दहा वर्षांपासून लघुलेखक म्हणून कार्यरत असल्याचे हजेरी रजिस्टरवरून दिसून येत असून, त्याबाबत गेल्या 8 मार्च रोजी नगर सचिव विभागात कार्यरत कर्मचार्‍यांची माहिती पाटील यांनी मागितली असता खरा प्रकार समोर आला. सोनवणे हे रामायण निवासस्थानी कोणत्याही प्रकारचे काम न करता हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करून वेतन घेत आहेत. याबाबत सोमवारी (दि.11) महापौर रंजना भानसी तसेच नगर सचिव गोरखनाथ आव्हाळे यांच्याबरोबर  झालेल्या बैठकीत पाटील यांनी सोनवणे यांच्याविषयी माहिती विचारली असता आम्ही त्यांना रामायण तसेच नगर सचिव कार्यालयात कामकाज करताना कधीही पाहिलेले नसल्याचे म्हटले आहे. 

महापालिकेत लघुलेखक तसेच इतर कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. असे असताना नगर सचिव विभागात संजय शिंदे या लिपिकाकडे महासभा व स्थायी समिती सभेचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी सोपविली आहे. तर दुसरीकडे सोनवणे मात्र दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करून वेतन घेत असल्याचे दिनकर पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. अशा नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाजास प्रशासन विभाग, नगर सचिव आणि आस्थापना अधीक्षक हे जबाबदार असून, या प्रकरणाची चौकशी करून बायोमेट्रिक हजेरी तपासण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सोनवणे हे सध्या कोठे कार्यरत आहेत व त्यांच्या कामकाजाचे स्वरूप काय आहे याबाबतची चौकशी करण्यात येऊन त्यांच्याकडून संपूर्ण वेतनाची व्याजासह वसुली करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे.