Sat, Jun 06, 2020 14:07होमपेज › Nashik › नाशिकला रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

नाशिकला रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

Published On: May 16 2019 2:09AM | Last Updated: May 16 2019 12:25AM
पंचवटी : वार्ताहर 

रामवाडी येथील चौघुले पेट्रोलपंपाजवळ तिघा जणांनी तंबाखू मागण्याचा बहाणा करत लूटमार करण्याच्या उद्देशाने एका रोइंगपटूला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये जखमीच्या पाठीत आणि हातावर वार लागले आहेत. या गुन्ह्यातील तिघाही संशयितांना पकडण्यात आले असून दोघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मंगळवार (दि.14) रोइंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे (24, रा. बाफना चाळ, क्रांतीनगर पंचवटी) हा त्याचा मित्र कामेश सुरेश मंडलिक (19, रा. आडगाव) नेहमीप्रमाणे बोटिंगचा सराव करून सायकलवरून घरी जात असताना रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरातील चौघुले पेट्रोलपंपाजवळ तिघा अज्ञात युवकांनी निखिल याच्याकडे तंबाखू मागितली. निखिलने मी तंबाखू खात नाही असे सांगितले. त्यातच एका संशयिताने निखिलच्या सायकलीला लाथ मारून झटापट सुरू केली. तर त्याच्या दुसर्‍या साथीदाराने कोयता काढून निखिलच्या पाठीवर मारला. निखिल खाली पडताच पुन्हा निखिलच्या डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने हात आडवा केल्याने निखिलच्या डाव्या हातावर घाव लागला. यावेळी रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेताच संशयितांनी बाजूला असलेल्या झाडीमध्ये पळ काढला. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने बुधवारी (दि.15) गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना मोरे मळा परिसरात सापळा रचून अटक केली. दीपक डगळे (21, रा. मोरेमळा) असे प्रमुख संशयिताचे नाव असून इतर दोनजण सतरा वर्षीय अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेततले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता देखील जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी दरम्यान, यापूर्वी देखील चौघुले पेट्रोलपंपाकडून रामवाडीकडे येणार्‍या रस्त्यावर संशयित विकी उर्फ काळ्या काळे याने अरुण अशोक बर्वे या मनपा कर्मचार्‍याची लूट करीत त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकून दिला होता. 

अनेकांची लूटमार केल्याचा संशय ः चौघुले पेट्रोलपंप ते रामवाडी, चोपडा लॉन्स ते मोरेमळा व हनुमानवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो याचाच फायदा घेत या कोयता गँगने यापूर्वी देखील काही नागरिकांचे मोबाइल आणि पैशांची लूट केली असल्याचा अंदाज पोलीस अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. मात्र, अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांची लूट झाली असल्यास त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.