होमपेज › Nashik › वेगळ्या विचारांचा सन्मान करणे शिका

वेगळ्या विचारांचा सन्मान करणे शिका

Published On: Mar 05 2019 1:44AM | Last Updated: Mar 04 2019 11:39PM
नाशिक : प्रतिनिधी

धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर केल्यानंतर सार्वजनिक वाचनालयावर दबाव आणणार्‍या प्रवृत्तींनी वेगळ्या विचारांचा सन्मान करण्याइतपत मनाचा मोठेपणा शिकून घ्यावा, अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्‍तिमत्त्व व उदारपण समजून घ्यावे किंवा किमान दोन चांगले ग्रंथ तरी वाचावेत. बाकी मला या प्रवृत्तींकडून फार अपेक्षा नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर टीका केली. 

येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि. 4) हा सोहळा झाला. मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्यानंतर काही प्रवृत्तींनी हा पुरस्कार रद्द करावा, असा दबाव सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकार्‍यांवर आणल्याचा दावा या कार्यक्रमात करण्यात आला. हाच धागा पकडून पवार यांनी विरोधकांवर आसूड ओढला. 

ज्येष्ठ समाजवादी नेते माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष होते. धनंजय मुंडे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 50 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप होते. यावेळी विरोधकांचा समाचार घेताना पवार म्हणाले, सार्वजनिक वाचनालयाला टीका वा दबाव नवीन असेल. मला मात्र याची सवय झाली आहे. मला असे अनेक मेसेज येतात. ते वाचल्यावर ‘आपली कोणीतरी नोंद घेतो’ या भावनेने बरे वाटते. काही वर्षांपूर्वी गृहमंत्री असताना एका कार्यक्रमासाठी दुबईला गेलो असता, तेथे आपण दाऊदला भेटल्याची पुडी कोणीतरी  सोडली. त्यावरून विरोधकांनी ‘दाऊदचा दोस्त’ म्हणत माझ्यावर बरीच टीका केली. पण काही सिद्ध न झाल्याने विरोधकच आपला मुद्दा विसरले. अलीकडे मी त्यांना त्या प्रकरणाची आठवण करून देत असतो, अशी मिश्किलीही त्यांनी केली. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांची व्यक्‍ती कर्तृत्ववान असल्यास तिचा सन्मान करण्याचा मनाचा मोठेपणा अटलबिहारी वाजपेयींमध्ये होता. बांगलादेश युद्धानंतर विरोधक असूनही त्यांनी इंदिरा गांधींना ‘दुर्गामाता’ संबोधले होते. दबाव आणणार्‍या प्रवृत्तींनी वाजपेयी समजून घ्यावेत. अशा दबावाविरोधात माणसे, संस्थांनीही मन घट्ट करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ग्रंथ हेच माणसाच्या आयुष्यातील खरे धन असल्याचे सांगत, यशवंतराव चव्हाण, देवकांत बारोह, पी. व्ही. नरसिंहराव, जॉर्ज फर्नांडिस अशा राजकारणातील वाचनप्रेमी व्यक्‍तींच्या आठवणी त्यांनी कथन केल्या. धनंजय मुंडे हे संघर्षाद्वारे परिस्थितीवर मात करणारे नेते असून, त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा वाढविल्याचेही पवार म्हणाले. 

पुरस्काराला उत्तर देताना धनंजय मुंडे काहीसे भावुक झाले. ते म्हणाले, ‘पाठीवर थाप देऊन फक्‍त लढ म्हणा’ असे म्हटले जाते. पण आजवर फक्‍त लढणेच नशिबी आले. पाठीवर शाबासकीची थाप पडलीच नाही. आज पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा स्वर्णीम क्षण असून, तो पाहायला आज वडील असते तर ते आणखी पंधरा वर्षे जगले असते. मुंडे यांच्या घरातून वेगळे काढल्यानंतर कोणाकडे जावे, असा प्रश्‍न निर्माण झाला असताना, पवार यांनी आधार दिला व मोठ्या विश्‍वासाने विरोधी पक्षनेतेपद दिले. त्यामुळे पुरस्कार त्यांना समर्पित करीत आहे. आजवर 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. हा पुरस्कार म्हणजे एकही विकेट न काढता केवळ चांगली बॉलिंग करणार्‍याला ‘मॅन ऑफ मॅच’ने गौरविण्यासारखे आहे. मी 16 विकेट काढल्या होत्या. फक्‍त अंपायर प्रामाणिक नव्हता. 

आमदार छगन भुजबळ, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. नानासाहेब बोरस्ते यांनी स्वागत, श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. आमदार हेमंत टकले यांनी पुरस्कार निवड समितीच्या वतीने मनोगत व्यक्‍त केले. प्रा. डॉ. वेदश्री थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास शौचे यांनी आभार मानले. 

पुरस्काराची रक्‍कम मांडवगणे कुटुंबीयांना पुरस्काराच्या 50 हजार रुपयांच्या रकमेत आणखी 51 हजार रुपयांची भर घालून एक लाख रुपये शहीद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांना देत असल्याची घोषणा यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. तसेच सावानाला 50 हजार रुपयांची देणगीही त्यांनी जाहीर केली. 

सत्ताधार्‍यांकडून जाच होतोय!

कार्यक्रमात स्थानिक सत्ताधार्‍यांकडून जाच होत असल्याची व्यथा आ. हेमंत टकले व श्रीकांत बेणी यांनी मांडली. कालिदास भाडेवाढ, ज्योतिकलश सभागृहाचे सील, सामाजिक सभागृहांच्या भाड्याची रेडीरेकनरद्वारे आकारणी आदी मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले.