Sat, Aug 24, 2019 10:01होमपेज › Nashik › तीन महिन्यानंतर खुनाचा छडा; दोघा तरुणांना अटक

तीन महिन्यानंतर खुनाचा छडा; दोघा तरुणांना अटक

Published On: Aug 04 2018 7:46PM | Last Updated: Aug 04 2018 7:46PMनाशिकरोड : वार्ताहर

वॉस्को चौकात तीन महिन्यांपूर्वी रोकडोबावाडी येथील बाळु उर्फ बाळासाहेब दोंदे (वय-४५) यांचा डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. खुनाचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याने तपास करण्यासाठी पोलिसांच्या पुढे मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी या खुनाचा छडा लावत दोघा संशयितांना अटक केली. शैलेश प्रकाश शेटे (वय- २४, रा. लोखंडे मळा, जेलरोड) व आदित्य रमेश नागरे (वय-२३, रा. जेलरोड) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघा संशयितांना न्यायालयाने (दि.७ ऑगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शैलेश व आदित्य हे दोघे जण (दि.९ मे) रोजी रात्री ८ वाजता कॅनॉलरोड येथून दारू पिण्यासाठी सुभाषरोड येथे गेले होते. या ठिकाणाहून मद्यपान करून जात असताना बाळु उर्फ बाळासाहेब दोंदे यांच्याशी किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यावेळी या दोघा तरूणांनी दोंदे यांना मारहाण केली. तर, रागाच्या भरात वॉस्को चौकात दोंदे यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात रात्रीच्या वेळी टवाळखोर, मद्यपी, गांजा पिणारे अशा सुमारे ८० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून माहिती मिळवली. गुन्हे शाखेचे विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीव्दारे या खुनातील संशयित जेलरोड येथील रहिवासी असल्याचे समजले. यानुसार वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जे.एस. शेलकर, यांच्यासह अन्य पोलिसांनी संशयितांच्या घरावर पाळत ठेवून शैलेश प्रकाश शेटे व आदित्य रमेश नागरे यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यात या दोघा संशयितांनी दोंदे यांच्या खूनाची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास शेलकर करीत आहेत.