Wed, Jun 19, 2019 08:37होमपेज › Nashik › नाशिकमध्ये दहा महिन्यांत 66 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

नाशिकमध्ये दहा महिन्यांत 66 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 12 2018 1:02AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे जानेवारी ते 11 ऑक्टोबर या कालावधीत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 20 तर महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 जण नगर जिल्ह्यातील तर एक नंदुरबार जिल्ह्यातील आहे. वर्षभरात 4 लाख 58 हजार 720 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 हजार 896 संशयित रुग्ण आढळले. तर 361 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. 

वातावरणातील बदल, रुग्णांकडून उपचार घेण्यासाठी होणारा उशीर यामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढत आहे. चालू वर्षात 66 रुग्णांना स्वाइन फ्लूमुळे जीव गमवावा लागला आहे. स्वाइन फ्लूचा धोका कमी व्हावा. यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्या सर्वत्र उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले जात आहेत. मात्र, तरीदेखील स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणार्‍यांचा आकडा वाढत आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात साडेचार लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी केली. त्यापैकी 361 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला. यात सर्वाधिक 304 रुग्णांवर नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले तर 57 रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. महापालिकेच्या शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍यांपैकी 46 जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित 20 रुग्ण जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत होते. त्याचप्रमाणे मृतांमध्ये नगर जिल्ह्यातीलही 12 जणांचा समावेश आहे. चांगल्या उपचाराच्या अपेक्षेने नगर जिल्ह्यातील 42 रुग्ण नाशिक जिल्ह्यात आले. त्यापैकी 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील एकाचा स्वाइन फ्लूमुळे नाशिक जिल्ह्यात मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयाकडे शेवटच्या क्षणी वाट

जिल्हा रुग्णालयात 11 ऑक्टोबरपर्यंत 20 रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. मात्र, यापैकी बहुतांशी रुग्ण हे खासगी रुग्णालयातून आले होते. रुग्ण दाखल केल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरणांत दिसून आले. रुग्ण बरा होत नसल्यास आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर नातेवाइकांना रुग्णास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे चित्र आहे. 

निफाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

स्वाइन फ्लूमुळे निफाड तालुक्यात सर्वाधिक 8 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल चांदवड, येवला तालुक्यात प्रत्येकी 4, बागलाण, सिन्नर, नाशिक तालुक्यात प्रत्येकी 3, तसेच मालेगाव तालुक्यात 2, तर देवळा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागाताील 104 रुग्णांपैकी 28 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच, शहरी भागात 208 रुग्णांपैकी 25 रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक महापालिकेच्या क्षेत्रातील 22 तर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.