Sun, Aug 18, 2019 06:02होमपेज › Nashik › ५१ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल 

५१ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल 

Published On: Feb 12 2019 1:08AM | Last Updated: Feb 12 2019 1:08AM
नाशिक : प्रतिनिधी

एप्रिल ते जून या काळात मुदत संपणार्‍या राज्यातील 565 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. येत्या गुरुवारी (दि. 14) प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून, 21 तारखेला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींची रणधुमाळी रंगणार असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.11) जाहीर केला. इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक 33 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. त्र्यंबकेश्‍वरमधील 10 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पाच ते सहा ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुका याचवेळी होणार आहेत. आयोगाच्या कार्यक्रमानुसार गुरुवारी मतदारयादी प्रसिद्ध करायची असून, त्यावर सोमवारपर्यंत (दि. 18) हरकती नोंदविता येणार आहे. दरम्यान, दाखल हरकती व सूचना निकाली काढत 21 तारखेला यादीची प्रसिद्धी करायची आहे. 

राज्यातील ग्रामपंचायतींचा कार्यक्रम यापूर्वीच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागला होता. परंतु, मतदारयाद्या व काही तांत्रिक अडचणींमुळे आयोगाने हा कार्यक्रम पुढे ढकलला होता. दरम्यान, सोमवारी आयोगाने नव्याने कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वीच संबंधित ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुका मिनी लोकसभा म्हणून पाहत आहेत.