Wed, Jun 19, 2019 08:19होमपेज › Nashik › एटीएम फोडून 28 लाख लुटले

एटीएम फोडून 28 लाख लुटले

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 12 2018 1:02AMनाशिकरोड : वार्ताहर

नाशिक-पुणे रोडवरील पोलीस उपआयुक्‍त परिमंडळ-2 कार्यालयासमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पहाटे फोडून 28 लाख 22 हजार 500 रुपये लंपास केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी केलेली चोरी कैद झाली असून, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुदेव अपार्टमेंटमध्ये असलेल्या या वस्तीत उपआयुक्‍त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कार्यालयासमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरट्यांनी पहाटे तीन वाजून 44 मिनिटांनी प्रवेश केला. त्यानंतर 20 मिनिटांत एटीएम फोडून 28 लाख 22 हजार 500 रुपये लंपास केल्याचा दावा करण्यात आला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्यात आलेले आहे. पहाटेच्या वेळी घडलेली घटना पोलिसांना सकाळी साडेदहा वाजता समजली. ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. या घटनेत दोन व्यक्‍तींचा समावेश असून, एकाचा व्हाइट शर्ट आणि टोपी असा पेहराव असून, दुसर्‍या व्यक्‍तीच्या तोंडाला काळ्या रंगाचा रुमाल, मंकी टोपी आणि निळ्या रंगाचा साधा शर्ट असा पोशाख आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या एटीएम मशीनच्या शेजारीच असणार्‍या एटीएम मशीनमध्ये तब्बल 38 लाख 51 हजार रुपये होते. एकावेळी एटीएम मशीनमध्ये 40 ते 50 लाख रुपये लोड केले जातात. मात्र, ग्राहकांनी या एटीएममधून पैसे काढले असल्याने चोरट्यांना 28 लाख रुपये हाती लागले. या एटीएममध्ये केवळ शंभर आणि पाचशेच्या नोटा होत्या. शेजारील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्येही तीन वाजून 24 मिनिटांनी पैसे काढण्यासाठी एक ग्राहक आल्याची नोंद असून, पांंढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये चोरटे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी उपनगरचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते तपास करीत आहे. या एटीएमसंदर्भात या आधीही दोन वेळा चोरट्यांनी एटीएममधील रोकड लंपास केलेली असून, पैसे टाकल्यानंतरच रोकड दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी लंपास होत आहे. विशेष म्हणजे या एटीएमचा विमा उतरवण्यात आलेला असून, पोलीस त्याही दृष्टीने तपास करीत आहेत. दुसर्‍यांदा एटीएम फोडले तेव्हा सात लाख 10 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. त्यावेळी पोलिसांनी 10 दिवसांत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे चोरटे लवकरच गजाआड होतील, असा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. अनेकवेळा एटीएम गजबज असलेल्या ठिकाणी तोडले जातात. या एटीएममध्ये पूर्णवेळ माणूस असावा, यासाठी अनेकवेळा दैनिक ङ्गपुढारीफने आवाज उठवला होता. मात्र, अजूनही या एटीएमला सुरक्षारक्षक मिळालेला नाही. गजबजलेल्या ठिकाणी आणि पोलीस उपआयुक्‍त कार्यालयासमोर ङ्गयाचि देही, याचि डोळाफ हे एटीएम फोडण्यात आले असून, नागरिकांकडून एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर चोरटे चोरी करीत असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी एटीएममधून तब्बल सात लाख 10 हजार रुपये लंपास करण्यात आले होते. त्या आधीची चोरी अशीच झाली होती. त्यामुळे संशयाचे भूत निर्माण झाले आहे.