Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भाषण माफियांकडून धर्मा पाटील यांची हत्या’

‘भाषण माफियांकडून धर्मा पाटील यांची हत्या’

Published On: Jan 30 2018 10:22AM | Last Updated: Jan 30 2018 10:22AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

‘‘भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील. धर्मा पाटील यांना मृत्यूस कवटाळावे लागले. कारण अधर्माच्या राज्यात त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्य़ा वाजवणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे ‘धर्मा’ पाटलांचे सत्य कोण ऐकणार? असा प्रश्न उपस्‍थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर जोरदार टीका केली.

संपादित जमिनीसाठी योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरून धुळे जिल्‍ह्यातील धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांनंतर जे.जे. रुग्‍णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांचे डायलिसीसही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचा २८ जानेवारी रोजी रात्री मृत्यू झाला. त्‍यांच्या मृत्‍यूला सध्या राज्‍यात असलेल्‍या भाजप सरकारला जबाबदार धरत भाजपवर सर्वच स्‍थरातून टीका होत आहे. सामनामधूनही भाजप सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

‘‘धर्माजी पाटील यांची प्राणज्योत मालवली आहे, पण त्या विझलेल्या जिवाने महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात जगण्या-लढण्याची ठिणगी पेटवली आहे. धर्मा पाटील हे धुळ्य़ातले सधन शेतकरी. ८४ वर्षांचा हा वृद्ध शेतकरी मुंबईत मंत्रालयाच्या दारात न्याय मागण्यासाठी येतो व न्याय नाकारला जातो तेव्हा त्याच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करतो, राज्य उत्तम चालल्याचे हे लक्षण नाही. राज्यात व देशात ‘अच्छे दिन’ आले व सर्वत्र आबादी आबाद आहे असे चित्र रंगवणाऱ्या थापेबाज टोळीने धर्मा पाटील यांची हत्या केली आहे.’’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

‘‘धर्मा पाटील यांची सुपीक शेतजमीन ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारने संपादित केली, पण त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. पाच एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. त्यात विहीर होती, ठिबक सिंचन, विजेचे पंप होते, पण या पाच एकर बागायती शेतीला फक्त पाच लाखांचा मोबदला ही तर शेतकऱ्यांची निर्घृण थट्टाच म्हणायला हवी. एका बाजूला धर्मा पाटील यांना फक्त चार लाख रुपये नुकसानभरपाई मिळते. मात्र दुसरीकडे त्याच गटातील ७४ गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला साधारण दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. कुठे धर्मा पाटलांचे चार लाख आणि कुठे हे दोन कोटी? या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी धर्मा पाटील तीन महिन्यांपासून सरकारदरबारी खेटे मारीत होते. जिल्ह्य़ातील सरकारी यंत्रणेने त्यांचा आवाज ऐकला नाही तेव्हा ते मंत्रालयात पोहोचले. तिथेही निराशा पदरी पडली तेव्हा त्यांनी त्याच मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्या केली.’’ त्‍यामुळे मुख्यमंत्री व सरकारांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex