Fri, Apr 26, 2019 19:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १०० कोटींच्या कर्जाचे प्रलोभन दाखवून ७३ लाखांची फसवणूक

१०० कोटींच्या कर्जाचे प्रलोभन दाखवून ७३ लाखांची फसवणूक

Published On: Sep 15 2018 2:11AM | Last Updated: Sep 15 2018 2:05AMठाणे : प्रतिनिधी

मौजे वाडा व जालना येथील स्टील कंपनी चालू करण्यासाठी साडेसहा टक्के व्याजदराने तब्बल 100 कोटींचे फायनान्स देतो, असे प्रलोभन दाखवून 73 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली. या प्रकरणी पाच आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. 

राजेश सिंघवी, सिंधू राजन, पिरूमल राज, चंद्रम, पांडियन अशी अटक करण्यात आलेल्या पाचजणांची नावे आहेत. माजिवड्यातील 52 वर्षीय तक्रारदार यांना त्यांच्या मौजे वाडा व जालना येथे स्टील बार बनवण्याची कंपनी चालू करायची होती. ही कंपनी सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपये साडेसहा टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष अटकेतल्या आरोपींनी तक्रारदार यांना दाखवले. तसेच 50 कोटींचे दोन डीडी दाखवून फिर्यादींचा विश्‍वास संपादन केला. 

दरम्यान, वचनपत्र बनवण्यासाठी 73 लाख रुपये घेऊन आरोपींनी कर्ज मिळवून न देता दिलेल्या पैशांचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2015 पासून ऑगस्ट 2018 या कालावधीत घडला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पाचजणांना अटक करण्यात आली. या घटनेत आणखी काही आरोपी आहेत का, तसेच एखादी आंतरराज्यीय टोळी  कार्यरत आहे का याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली करीत आहेत.