होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षक भरती : न संपणारा 'पवित्र'(?) गोंधळ

शिक्षक भरती : न संपणारा 'पवित्र'(?) गोंधळ

Published On: Jun 10 2019 8:52PM | Last Updated: Jun 11 2019 1:11AM
शंकर पवार, पुढारी ऑनलाईन

शिक्षक भरतीसाठी गेल्या 9 वर्षांपासून आस लावून बसलेल्या लाखो तरुणांची दिशाभूल करण्यात सरकारला पुरते यश आले आहे, आता असेच म्हणावे लागेल. कारण गेल्या दीड वर्षांपासून सुरू असणारा 'पवित्र' गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पवित्र पोर्टलवरून तांत्रिक अडचणींबाबत रोज-रोज जाहीर होणाऱ्या नव्या सूचनांनी उमेदवारांचे डोके बंद पडायची वेळ आली आहे. हे असेच चालू राहिले तर उमेदवारांवर शिक्षक म्हणून भरती होण्याऐवजी एखाद्या इस्पितळात भरती होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. 

राज्यातील लाखभर उमेदवारांचा रोजचा दिवस उगवतो तो भरतीबाबत आज काय सूचना येणार? या प्रश्नाने. सुरू झाले का पवित्र पोर्टल? हा प्रश्न तर दिवसभरात कितीतरी वेळा सोशल माध्यमांतून चर्चिला जात असेल. दोन बीएड, डीएड धारक भेटले तरी हाच प्रश्न सतावतो. या प्रश्नापासून कितीजरी दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग ‘भजी’ तळण्यासाठीही होत नाही. याचं दु:ख आहेच. त्यामुळे पुन्हा कुणालातरी विचारावंच लागतं. झालं कारे पवित्र पोर्टल सुरू? उमेदवारांच्या आयुष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा पवित्र प्रश्न चांगलाच पिच्छा पुरवताना दिसतोय. 

शिक्षक भरती ही प्रक्रियाच एवढी गोंधळाची करून ठेवली आहे की भरती करणाऱ्याला आणि भरती होणाऱ्यालाही याबाबत कोणतीही निश्चितता वाटत नसेल. कारण, सरकारने याबाबत जी आश्वासने दिली ती आश्वासनेही पवित्र पोर्टलमधील गोंधळाप्रमाणेच रोज नवा गोंधळ घालणारीच वाटतात. सुरुवातीला 24 हजार शिक्षक भरती पवित्र माध्यमातून करण्याच्या घोषणेने लाखो पात्रताधारकांच्या जीवात जीव आला. मात्र, ही 24 हजारांची भरती होता-होता 12 हजारांवर येऊन ठेपली आणि गेल्या दीड वर्षांपासून पवित्र फेऱ्यात अडकली. हा फेरा काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. 

पवित्र प्रणाली पारदर्शी भरतीसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे की उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी असाच प्रश्न आता पडू लागला आहे. यामध्ये अनेक त्रुटी आणि दोष आहेत. या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना आशा लावून गोंधळात टाकण्याचा मायबाप सरकारचा मनसुबा दिसत आहे. डीएड, बीएड प्रवेशापूर्वी प्रवेश परीक्षा देऊन, त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करूनही सरकारला शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची गरज वाटली. आतापर्यंत सहा पात्रता परीक्षा झाल्या. पुन्हा सरकारला टीएआयटीची कल्पना सुचली. अर्थात शिक्षक भरती ही प्रयोगशाळा झाली असून सरकार उमेदवारांवर रोज नवनवे प्रयोग करत असल्याचेच यातून दिसत आहे. 

पुढे टीएआयटीची परीक्षा झाली आणि पुन्हा पवित्रचा सावळा गोंधळ सुरू झाला. थेट पारदर्शी भरती करणार म्हणता-म्हणता केवळ सरकारी संस्था आणि पवित्र माध्यमातून भरती करू इच्छिणाऱ्या संस्थांपुरतीच पारदर्शिता उरणार आहे. बाकी खासगी संस्थांत थेट भरतीऐवजी एकास दहा प्रमाणात उमेदवार देऊन संस्थांवर निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे यामध्ये किती ‘पारदर्शिता’ राहणार आहे, हे सर्वांना माहीतच आहे. यातील मुलाखतीची प्रक्रिया गुणवत्ताधारकांना नोकरीपासून वंचित ठेवणार यात शंकाच नाही. कारण, मुलाखतीला नकार नसला तरी त्यातून होणाऱ्या आर्थिक देव-घेवीला रोखणे शक्य कोटीतील वाटत नाही. 

या सर्वांबरोबरच संस्थांनी दिलेली रिक्त जागांची माहिती, त्यांचे आक्षेप, आरक्षणातील गोंधळ यासारख्या कारणांवरून न्यायालयात तक्रारी झाल्या. त्याचे निकाल येणे, त्यानुसार भरती प्रक्रियेत बदल करावे लागणे हेही जणू नित्याचेच झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शिक्षक भरती झाली. तरी उमेदवारांमागचे प्रश्न संपतील असे नाही. भावी शिक्षकांसाठी पुढची वाटही बिकटच असणार आहे. 9 वर्षे भरतीची वाट बघितल्यानंतर शिक्षक झाले तरी गरजा पूर्ण होतील एवढे मानधन मिळणार नाहीच पुन्हा तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून 6-9 हजार रुपयांवर काम करावे लागणार आहे. तेही पुढील प्रक्रियेत कोणते अडथळे आले नाहीत तर. 

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर शिक्षक भरती पूर्ण करून पहिल्यादिवशीच नवीन शिक्षकांना रूजू करून घेण्यात येणार होते. मात्र, पवित्रच्या तांत्रिक बिघाडामुळे १७ जूनला शिक्षक म्हणून रूजू होता येईल, हे तरुणांचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे. अशीच दिवास्वप्ने उमेदवार गेल्या काही काळापासून बघत आला आहे. मुळात शिक्षक होण्याची वाटच एवढी बिकट आहे की अनेकांना आता हा आत्मघात वाटू लागला आहे. आयुष्यातील कितीतरी वर्षे ही खोटी आस लावून घालवली आहेत. आता आणखी किती वाट पाहावी लागेल आणि तोच प्रश्न, तोच गोंधळ किती दिवस सतावेल कुणीही सांगू शकणार नाही. कारण आपण आत्मघाताचाच मार्ग निवडला आहे.