Mon, Jul 06, 2020 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझ्याविरोधात विरोधकांचे षड्यंत्र; मानहानीचा दावा दाखल करणार : सुप्रिया सुळे

माझ्याविरोधात विरोधकांचे षड्यंत्र; मानहानीचा दावा दाखल करणार : सुप्रिया सुळे

Published On: Apr 18 2019 3:19PM | Last Updated: Apr 18 2019 3:22PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

बारमती मतदारसंघात मतदान होण्यास केवळ तीन दिवस उरले असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राहुल शेवाळेंना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्‍लिप समोर आली. ही क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आणि त्याच्याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. या चर्चेची दखल घेत माझ्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, की दुर्दैव आहे माझ्यासाठी माझी निवडणूक तीन दिवसावर येऊन ठेपली आहे. अब्रु नुकसान करण्यासाठी माझ्या विरोधात हे षडयंत्र रचले आहे. माझ्या विरोधात बोलण्याठी यांच्याकडे कोणतेच पुरावे नाही त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन राजकारण विरोधकांनी केले आहे. दुर्दैव आहे की एक महिला यशस्वीपणे काहीतरी करतीय ते त्यांना बगवत नाही. 

जर ही ऑडिओ क्लिप खरी असेल तर ते पोलिस स्टेशनकडे का नाही गेले असा सवाल करत सुप्रिया म्हणाल्या, भिती वाटत असती तर एखादा माणूस पोलिसांकडे जाईल ना? माध्यामांकडे कशाला जाईल? असे त्या म्हणाल्या.  

यामध्ये कोणतेही रॉकेट सायन्स नसून माझ्याविरोधात रचण्यात आलेले षड्यंत्र आहे. मी माझा सुसंस्कृतपणा कधीही सोडलेला नाही. उभ्या महाराष्ट्राने गेली १० वर्ष माझे काम पाहिले आहे. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. मी माझ्या वकिलांशी चर्चा करून मानहानीचा दावा दाखल करणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही आणि करणारही नाही. मी एक महिला म्हणूनच न्याय मागणार असल्याचे सुळे म्हणाल्या,