Sun, Aug 18, 2019 06:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मर्यादेत २ हजार कोटींची वाढ

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मर्यादेत २ हजार कोटींची वाढ

Published On: Feb 12 2019 2:15PM | Last Updated: Feb 12 2019 2:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  

तसेच पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 
१. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ.
२. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ८० चिकित्सालये स्थापणार.
३. नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-१) करण्यास मान्यता.
४. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राज्यात राबविण्यास मान्यता.
५. राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात ०५:४५:५० याप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता.
६. सेवानिवृत्त तालुका निरीक्षक भूमी अभिलेख बाबुराव नानासाहेब आर्दड यांना लाचलुचपत प्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याच्या दिनांकापासून त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्यास मान्यता.
७. पुण्यातील स्पाईसर एडव्हान्टीस युनिव्हर्सिटी संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.