Sat, Jul 04, 2020 17:38



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निसर्ग चक्रीवादळ मुंबईजवळ पोहोचले 

निसर्ग चक्रीवादळ मुंबईजवळ पोहोचले 

Last Updated: Jun 03 2020 4:11PM

निसर्ग चक्रीवादळाचे सॅटेलाईट छायाचित्र.



मुंबई : पुढारी ऑनलाईन

निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर (रायगडात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे) दुपारी साडेबाराच्या सुमारास धडकले. हे वादळ शक्तिशाली असून सध्या ते अलिबागच्या पूर्व-दक्षिण भागात घोंघावत आहे. हे वादळ मुंबई (कुलाबा) पासून दक्षिण पूर्व दिशेला ७५ किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. तर ते पुण्यापासून पश्चिमेला ६५ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आहे तिथे ९०-१०० ते ११० प्रतिताशी वेगाने वारे वहात आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून रत्नागिरीत ३८ मिलिमीटर, अलिबागमध्ये ४५ मिलिमीटर, कुलाबा येथे २३ मिलिमीटर पावासाची नोंद झाली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग १०० किलोमीटर प्रतितास होता. पुढील काही तासांत निसर्ग चक्रीवादळ मुंबईत जाऊन धडकणार आहे. रायगड, मुंबई, ठाण्याच्या काही भागांना धडकून हे वादळ पुढे जाईल. या दरम्यान १ ते २ मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.