होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीचे पुसाळकर उद्यान प्रेमीयुगुलांना आंदण

डोंबिवलीचे पुसाळकर उद्यान प्रेमीयुगुलांना आंदण

Published On: Feb 11 2018 9:46PM | Last Updated: Feb 11 2018 9:46PMडोंबिवली : वार्ताहर

सुसज्ज जॉगिंग ट्रॅक, चहूबाजूंनी झाडांची हिरवळ, बसण्यासाठी बाकडे, या सुविधा आहेत डोंबिवलीतील पुसाळकर उद्यानात. सोयी-सुविधांनी हे उद्यान सुसज्ज असल्याने सकाळ-संध्याकाळ पाय मोकळे करण्यासाठी या उद्यानात यापूर्वी आबाल-वृद्धांची गर्दी होत असे. तरुण मंडळीही सकाळी मोकळ्या हवेत जॉगिंग करण्यासाठी येथे येत असत. चहूबाजूंनी झाडांची दाटी असल्याने या निसर्गरम्य वातावरणात यायला प्रत्येकालाच आवडते, म्हणून पाय मोकळे करण्यासाठी परिसरातील रहिवासी या उद्यानाचा पुरेपूर उपयोग करायचे. मात्र सद्या आबाल-वृद्धांची अशा उद्यानांकडील ओढ रोडावली आहे. 

पुसाळकर उद्यान सद्या प्रेमीयुगुलांना आंदण दिल्याचे चित्र दिसत आहे. तर काही बदमाशांनी या उद्यानातील शिल्पांची मोडतोड तर केलीच, शिवाय स्त्री शिल्पांची अश्लील विटंबना केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

दिनक्रम सुरू होण्यापूर्वी पहाटेच्या वेळेत शहरातील मोकळ्या जागांवर शतपावली, योगासने, सायकल चालविणे, धावणे असे प्रकार करण्याकडे अनेकांचा कल असतो. डोंबिवली पूर्व भागातील टंडन रोडवरील कै. विजय वामन पुसाळकर उद्यान हे रामनगर, दत्तनगर आदी परिसरांतील रहिवाशांना मध्यवर्ती ठिकाणी आहे. परिसराचे तत्कालीन नगरसेवक मुकुंद तथा भाई देसाई यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात असलेल्या या उद्यानाचे 25 ऑगष्ट 2010 रोजी तत्कालीन महापौर रमेश जाधव यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने 54 लाख रुपये खर्च करून या उद्यानाचे सुशोभीकरण केले. 

नागरिकांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला. उद्यानाच्या मध्यवर्ती भागात वेगवेगळे भाग तयार करून त्याच्या मध्यभागी शोभेची व फुलांची झाडे लावण्यात आली. या झाडांच्या बाजूला केलेल्या पारावर बसून अनेक नागरिक बैठे व्यायाम करत असत. उद्यानातील काही भाग हा मोकळा ठेवण्यात आला असून तेथे खेळाडू बॅडमिंटन, क्रिकेट असे खेळ खेळत असत. यामुळे या भागातील नागरिकांची या उद्यानात सकाळ-संध्याकाळ गर्दी पाहायला मिळत असे. घराजवळच उद्यान विकसित झाल्याने परिसरातील रहिवासी समाधानी आहेत. मात्र उद्यानात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रेमीयुगुले तेथील झाडांच्या आडोशाला जाऊन बसतात. त्यांच्या चाळ्यांमुळे उद्यानात फिरणे अवघड होते. तसेच रात्रीच्या वेळेत तेथे चोरीछुपे मेजवान्या, ओल्या पार्ट्या झोडल्या जातात. त्याचा सगळा कचरा तेथे नियमित पडून असतो. 

काही महिला उद्यानात संध्याकाळी भाजी निवडतात आणि त्याचा कचरा येथेच टाकून जातात. मुलांसाठी आणलेली खाऊची पाकिटेही पडलेली असतात. उद्यानाच्या बाहेर उजव्या दिशेला काही नागरिक कचरा टाकत होते. परंतु एका खासगी संस्थेने येथे बाग उभारल्याने आता नागरिकांनी बागेच्या बाजूला असलेल्या गटाराकडे आपला मोर्चा वळविला असून या गटारात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याची तक्रार तेथील नागरिक करत आहेत. 

यापेक्षाही भयंकर समस्या म्हणजे प्रेमीयुगुले आणि त्यांचे चाळे पाहण्यासाठी आंबटशौकीनांचा या उद्यानात मोठा राबता असतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांची फार मोठी कुचंबना होत असते. या उद्यानात योगासन, नृत्य करणारी सुंदर शिल्पे ठेवण्यात आली आहेत. गोगलगायीवर बसून पुस्तक वाचणाऱ्या उंदिरमामाचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या शिल्पांची समाजकंटकांनी मोडतोड करून टाकली आहे. योगासन करणाऱ्या स्त्री शिल्पाची अश्लील विटंबना केली आहे. या समाजकंटकांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.

उद्यानाच्या एका बाजूला सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. काही नागरिकांनी येथे स्वच्छतागृह उभारणीसाठी सुरुवातीला विरोध केला होता, परंतु तरीही पालिकेने येथे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारलेच. केवळ स्वच्छतागृह उभारले, तेथे पाण्याची सोय मात्र नाही. आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक येथे प्रातर्विधीसाठी येतात, परंतु ते स्वच्छ राखले जात नसल्याने दिवसभर या स्वच्छतागृहाच्या दरुगधीचा सामना उद्यानात येणाऱ्या नागरिकांना करावा लागतो. महापालिकेचे हे उद्यान असल्याने येथे सुरक्षारक्षक तैनात करा ही रहिवाशांची मागणी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

नागरिकांच्या मागण्या : 
बागेमधील अनेक विजेचे खांब नादुरूस्त आहेत, त्याची दुरुस्ती करण्यात यावी. प्रेमीयुगुलांना हुसकावून देण्यात यावे. बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी वेळ ठरवून द्यावी. सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी. बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी उपलब्ध करून द्यावी. नागरिकांना व्यायाम करण्यासाठी काही साधने उपलब्ध करून द्यावीत. सार्वजनिक कार्यक्रमांचा एखादा फलक व एखादे वृत्तपत्र वाचनालय येथे उभारावे, अशी मागणी पुढे आली आहे.