Mon, Sep 16, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युवासेना रुसली, पूनम महाजन मातोश्रीवर

युवासेना रुसली, पूनम महाजन मातोश्रीवर

Published On: Mar 31 2019 2:43PM | Last Updated: Mar 31 2019 2:46PM
मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांकडून एकत्रितपणे प्रचार केला जात असल्याचे चित्र असून, शनिवारी गांधीनगरात तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची गळाभेटही झाली. असे असले तरी मुंबईत मात्र युतीमध्ये काही बरे चाललेले नाही. तीन दिवसांपासून रुसलेल्या युवा सेनेची मनधरणी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर-मध्य मुंबईतील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी रविवारी मातोश्री गाठले. 

भाजपा उमेदवाराच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र नसल्याचे कारण पुढे करत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पूनम महाजन यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर पूनम महाजन यांनी रविवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आर्शिवाद घेतले. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात लावण्यात आलेला फलक शिवसेना-भाजपमध्ये वादाचे कारण ठरला आहे. प्रचारासाठी लावण्यात आलेल्या या फलकावर आदित्य ठाकरे यांना स्थान देण्यात येत नसल्याचा निषेध नोंदवत युवासेना सचिव वरुण सरदेसाई व त्यांच्या सहकार्‍यांनी पुनम महाजन यांच्या प्रचाराकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी पुनम महाजन यांनी मातोश्रीवर भेट देऊन ठाकरे कुटुंबियांशी चर्चा केली.

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात युवासेनेची चांगली ताकद आहे. शिवाय ठाकरे कुटुबियांचे निवास्थानही याच मतदारसंघात येते. याचा विचार करता युवासेनेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर नाराज करून चालणार नाही. यामुळे पुनम महाजन यांनी आदित्य व त्यांच्या सहकार्‍यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीवरील भेटीनंतर आदित्य व पुनम महाजन या दोघांचा हात मिळवतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान शिवसेना विभागप्रमुख आ.अनिल परब, शिवसेना सचिव अनिल देसाई देखील उपस्थित होते.