Wed, Jun 03, 2020 05:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय प्रवेशाचा तिढा कायम; विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

वैद्यकीय प्रवेशाचा तिढा कायम; विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

Published On: May 15 2019 6:40PM | Last Updated: May 15 2019 6:40PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. या विद्यार्थ्यांचे गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरुच आहे.  याच दरम्यान मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली. याबाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आरक्षणांतर्गत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे २५० मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य आज अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. प्रवेशाचा हा घोळ लवकर संपवावा, तसेच या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने सोमवारी सात दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतरही मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत सरकार प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.