Sun, May 31, 2020 01:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अब की बार २२० पार, महायुतीचा विजय निश्चित : चंद्रकांत पाटील 

अब की बार २२० पार, महायुतीचा विजय निश्चित : चंद्रकांत पाटील 

Published On: Sep 21 2019 3:15PM | Last Updated: Sep 21 2019 3:15PM
मुंबई : प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असून, निवडणुकीत महायुती किमान 220 जागा जिंकून विजयी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद ध्यानात घेता महायुतीला 220 पेक्षाही जास्त जागा मिळू शकतात, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला.

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले काम आम्ही जनतेसमोर मांडू. गेल्या पाच वर्षांत विविध निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने यश मिळालेले आहे. भाजप महायुती सरकारचे काम आणि गेल्या पाच वर्षांतील संघटनात्मक तयारी यामुळे आगामी निवडणुकीत नक्की यश मिळेल.

भाजप शिवेसना युतीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान चर्चा चालू आहे. युतीची घोषणा लवकरच होईल, अशी माहिती त्यांनी दिली.