Mon, Jun 17, 2019 11:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोपनीय सर्व्हेने भाजपमध्ये खळबळ

गोपनीय सर्व्हेने भाजपमध्ये खळबळ

Published On: Oct 12 2018 1:29AM | Last Updated: Oct 12 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या आमदार, खासदारांच्या कामगिरीचा गोपनीय सर्व्हे करण्यात आला असून, या सर्व्हेमध्ये सुमारे 35 ते 40 टक्के आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे आढळून आले आहे. तर सहा ते सात खासदारांबाबतही सर्व्हेचे रिपोर्ट अनुकूल नाहीत. हे रिपोर्टकार्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हाती ठेवल्याने अशा आमदार, खासदारांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर त्यांची तिकिटे कापली जाण्याचेही संकेत आहेत.

लोकसभा निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता असून, विधानसभा निवडणूकही वर्षभरात होईल. या निवडणुकीपूर्वी दिल्लीतील चाणक्य या संस्थेकडून खासदार, आमदारांच्या कामगिरीबाबत जनमत चाचणी घेण्यात आली. दोन ते तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या या चाचणीचे रिपोर्ट मुख्यमंत्र्यांनी बंद लिफाफ्यात प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या हाती सोपविले. हे अहवाल एकट्याने पाहण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. मात्र, त्यातील रिपोर्ट पाहून भाजपच्या अनेक खासदार, आमदारांचे धाबे दणाणले आहे.

अहवालात त्यांनी केलेली जनहिताची कामे, प्रलंबित कामे, जातीय समीकरणे, जनतेची त्यांच्याबद्दलची मते, निवडणुकीवर परिणाम करणारे मुद्दे आदींची इत्थंभूत माहिती या अहवालामध्ये आहे. त्यामध्ये सुमारे 35 ते 40 टक्के आमदारांचे रिपोर्टकार्ड हे असमाधानकारक आहे. जनमत त्यांच्याबाबत फारसे अनुकूल नसल्याचे आढळून आले आहे. सहा ते सात खासदारांबाबतही मतदारांनी सर्व्हेत नाराजी प्रकट केली आहे. राजकारणात तीन महिन्यांतही बदल घडवून आणता येतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निष्क्रिय खासदारांना धोक्याचा इशारा दिला आहे.