Fri, Apr 26, 2019 19:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेबंदी!

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेबंदी!

Published On: Sep 15 2018 2:15AM | Last Updated: Sep 15 2018 8:08AMमुंबई : प्रतिनिधी

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि साऊंड सिस्टीम वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. सण येत-जात राहतील; पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने डीजे मालकांना सुनावले. 19 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येणार आहे. तोपर्यंत निघणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांचाच दणदणाट ऐकायला मिळणार आहे.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात डीजेसारख्या कर्णकर्कश वाद्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अशी वाद्ये वाजवण्यास परवानगी नाकारत असल्याचा दावा करत ‘प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटनिंग असोसिएशन’ने अ‍ॅड. सतीश तळेकर      यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या मंगळवारी सुनावणी झाली. या प्रकरणी  उच्च न्यायालयाचे  न्या. शंतनू खेमकर आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी त्यावर मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी घातली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी डीजेवर बंदी बंदी का? लाईव्ह कॉन्सर्ट आणि ढोल-ताशामुळेही आवाज होतो. मग आमच्यावर बंदी का, असा प्रश्‍न उपस्थित केला. सरकारने बंदी घालताना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंदी घातली असल्याचे सांगितले आहे; पण न्यायालयाचे अशाप्रकारचे कोणतेही निर्देश नसल्याची बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मांडली.

सरकारच्या भूमिकेनंतर 19 रोजी कोर्टाचा अंतिम निर्णय

‘सण येत-जात राहतील; पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही’, असे उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान डीजे मालकांना सुनावले. मात्र, साऊंड सिस्टीमच्या वापरावर सरसकट बंदी घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 19 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.