Fri, Apr 26, 2019 20:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फटाके फोडले : १०० हून अधिक गुन्हे  

फटाके फोडले : १०० हून अधिक गुन्हे  

Published On: Nov 10 2018 1:13AM | Last Updated: Nov 10 2018 12:48AMमुंबई : प्रतिनिधी

फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या नियमांची पायमल्ली करत रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणार्‍यांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसांत सुमारे शंभरहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच सुमारे 40 गुन्हे शिवडी, परळ, लालबाग, काळाचौकी, सायन, माटुंगा विभाग येणार्‍या एकट्या परिमंडळ चारमध्ये दाखल झाले आहेत.

फटाक्यांमुळे होणार्‍या ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या दोन तासांतच कमी तिव्रतेचे फटाके फोडण्याचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा अतिउत्साही मुंबईकर या वेळा वगळून फटाके फोडत असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या रात्री मोठ्याप्रमाणात फटाके फोडण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांच्या तक्रारीवरुन आणि स्वत: फिर्याद दाखल करत पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे 100 हून अधिक गुन्हे नोंदविल्याची माहिती मिळते. तर मरीन ड्राईव्ह परिसरात वारंवार बजावूनसूद्धा रात्री दहा वाजल्यानंतर फटाके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

अंधेरी पूर्वेकडील चांदिवली परिसरातील रहिवासी महेंद्र जैस्वाल (29) हे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास कुटुंबासोबत येथील संघर्षनगरमधील हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. येथे काही मुले रस्त्यावर फटाके फोडत होती. यातील एक फटाका जैस्वाल यांच्या पत्नीच्या साडीवर पडून साडीने पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पादचार्‍यांच्या मदतीने जैस्वाल यांनी आग विझवली. घटनास्थळी पोहचलेल्या साकिनाका पोलिसांनी जैस्वाल यांची फिर्याद नोंदवून घेत, फटाके फोडल्याने साडीस आग लागून जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हेमंत तारके (19) आणि विनय मिश्रा (20) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

वडाळ्यातील फिशमार्केट परिसरात राहात असलेल्या निलेश साटम यांच्या इमारतीखाली बुधवारी रात्री मुले फटाके वाजवत होती. रात्री सव्वादहाच्या सुमारास एका फटाक्याची ठिणगी साटम राहात असलेल्या नवव्या मजल्यावरील ग्रीलमध्ये उडाल्याने साटम यांनी सुकत घातलेल्या कपड्यांनी पेट घेतला. साटम कुटुंबियांनी घरातील पाण्याने ही आग विझवली. मात्र तोपर्यंत कपडे जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोहचलेल्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी साटम यांची फिर्याद नोंदवून घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पायधुनीतील मोहम्मद अली रोडच्या फुटपाथवर फटाके विक्री करत असलेल्या अल्ताफ शेख (36) याच्यावर पायधुनी पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. त्याच्याजवळून पोलिसांनी 8 हजार 664 रुपये किंमतीचे फटाके जप्त केले समतानगर पोलीस ठाण्यातील पिटर ऑपरेटर पोलीस नाईक सोनू नेमण (47) यांनी पोलिसांतर्फे फिर्याद नोंदवत बुधवारी मध्यरात्री कांदिवली पूर्वेकडील दळवी इमारतीसमोर फटाके फोडत असलेल्या किशोर गिरी याच्यासह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला.

वांद्रे येथे तिघांना अटक

मुंबई :  वांद्रे येथे रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणार्‍या कौस्तुभ मांजरेकर, संकेत कदम आणि हरिओम चौरसिया या तिघांना निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची वांद्रे येथील लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली 

आहे. दोन दिवसांपूर्वी मानखुर्द येथे फटाके फोडणार्‍या एका अज्ञात तरुणाविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहापर्यंत फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर फटाके वाजवणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. वांद्रे येथे लक्ष्मीपूजनाच्या रात्री काही तरुण निर्मलनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाके फोडत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. 

तिथे पोलिसांनी जाऊन तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र विशेष अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. 

ध्वनी प्रदूषण किंचित घटले

मुंबई : मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनी प्रदूषणाच्या प्रमाणात थोडी घट झाली असली तरी मोठ्या प्रमाणात फरक पडला नसल्याचे आवाज फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या निर्बंधांनंतर फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा होती मात्र यावेळीही अपेक्षाभंग झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. 

आवाज फाऊंडेशनकडून मागील दोन दिवसांपासून शहरातील ध्वनी प्रदूषणाचा सर्वे केला जात आहे. यात त्यांना मागील वर्षीच्या तुलनेत काहीसा फरक आढळून आला आहे. मुंबईत यंदा 114.1 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली असून मागील वर्षी  117.8 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती. मुंबईत सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण हे मरीन ड्राईव्ह परिसरात असल्याचे अहवालात समोर आले आहे. मात्र ध्वनी प्रदूषणाच्या अहवालातील आकड्यांवरून असे स्पष्ट होते की, शहरातील ध्वनी प्रदूषण कमी झाले असले तरी हे प्रमाण अतिशय कमी आहे. कोर्टाच्या आदेशांनंतर मोठी घट पहायला मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र यंदाही अपेक्षाभंगच झाला आहे असे आवाज फाउंडेशनने सांगितले.

गेल्या वर्षी प्रदूषणामुळे 25 लाख माणसांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे हे मृत्यू झाले का? याचा विचार करायला हवा. सध्या सर्वात जास्त प्रदूषण हे वीज, मोटार, सिमेंट व रिफायनरीमधून होत आहे. पर्यावरणप्रेमी किंवा अनेक संस्था फक्त दिवाळीमध्ये होणारे प्रदूषण पहात आहेत. दिवाळी व सणांमध्ये प्रदूषण होत असले तरी वर्षभरात होणारे प्रदूषणाकडेहे लक्ष देण्याची गरज आहे. न्यायालयाने वर्षभरात होणार्‍या प्रदूषणांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

गिरीष राऊत, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ, निमंत्रक