Fri, Apr 26, 2019 19:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्षीरसागरांच्या ‘वर्षा’ भेटीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

क्षीरसागरांच्या ‘वर्षा’ भेटीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

Published On: Sep 15 2018 2:11AM | Last Updated: Sep 15 2018 2:07AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर भेट देऊन गणेशाची आरती केली. यावेळी बीड जिल्ह्यातील भाजपचे अन्य नेतेही  सोबत होते. त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रायलस्टोन या निवासस्थानीही गणपतीचे दर्शन घेतले. क्षीरसागर यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जयदत्त क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिलेले महत्त्व आणि त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न केल्याने जयदत्त क्षीरसागर हे अस्वस्थ आहेत. पक्षातील एका गटाकडून क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ देण्यात आल्याने त्यांची घुसमट वाढली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या दौर्‍यात जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी चहापान घेतले होते. तेव्हापासून क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर क्षीरसागर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली. या निवडीनंतर क्षीरसागर पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे क्षीरसागर यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा होती. क्षीरसागर यांचे बंधू भारतभूषण, भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस, रमेश आडसकर आदी भाजप नेते उपस्थित होते.  गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमात एकमेकांची भेट घेतली जाते. त्यामुळे अशा भेटीतून राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतले कृपाशंकर सिंह, नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या यांच्या घरी जाऊन घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. सध्या राजकारणापासून काहीसे अलिप्त असलेले कृपाशंकर सिंह हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चाही झाल्याचे समजते. शिवसेनेशी संबंध ताणलेले असताना मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनाची परंपरा मुख्यमंत्र्यांनी यंदाही पाळली.