Fri, Jan 24, 2020 04:51
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्‍यातील २३०० इंटर्न डॉक्टर बेमुदत संपावर

राज्‍यातील २३०० इंटर्न डॉक्टर बेमुदत संपावर

Published On: Jun 13 2018 3:51PM | Last Updated: Jun 13 2018 3:51PMमुंबई  : प्रतिनिधी 

राज्यभरातील वैद्यकीय विद्यापीठात इंटर्न डॉक्टर संपावर आहेत. वेतनवाढीच्या मागणीसाठी इंटर्न डॉक्टरांनी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. इंटर्न डॉक्टरांना मिळणारे वेतन वाढवून ११,००० रूपये करण्याची डॉक्टरांची मागणी आहे.

इंटर्न डॉक्टरांच्या संपाबाबत पुढारीशी बोलताना इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेचे महासचिव डॉ. गोकूळ राख म्हणाले की, “मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून आम्ही संप सुरु केला आहे. आम्ही सर्व काम बंद ठेवले. इंटर्न डॉक्टराचे काम आपात्कालीन परिस्थितीत असते. त्यामुळे आम्ही ते काम देखील बंद ठेवले आहे . जेणेकरून आमच्या संपाची दखल घेतली जाईल.”

इंटर्न डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला होता. इंटर्न डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव संजय देशमुख यांच्याशी देखील चर्चा केली. पण, सरकारसोबत डॉक्टरांच्या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. त्यानंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले.

डॉक्टरांचा आरोप आहे की, २०१५ मध्ये राज्य सरकारने इंटर्न डॉक्टरांना मिळणारे वेतन वाढवून ११,००० रूपये करण्याचे आश्वासन देण्यात आले  होते. पण, यानंतर राज्य सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आला नाही. गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर राज्य सरकारसोबत चर्चा करतायत. पण, सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.