Wed, Jul 24, 2019 14:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय विद्यार्थ्यांवर अन्याय; सरकारने अध्यादेश काढावा : खासदार संभाजीराजे 

वैद्यकीय विद्यार्थ्यांवर अन्याय; सरकारने अध्यादेश काढावा : खासदार संभाजीराजे 

Published On: May 15 2019 4:14PM | Last Updated: May 15 2019 4:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. या विद्यार्थ्यांचे गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरुच आहे. आज, बुधवारी आंदोलनस्थळी खासदार संभाजीराजे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की या मुलांच्यावर अन्याय झालेला आहे, सरकारने त्यांची बाजू समजून घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात लवकरात लवकर अध्यादेश काढावा व या विध्यार्थ्यांना न्याय द्यावा.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने सोमवारी सात दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतरही मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत सरकार प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मंगळवारी गुणवत्तेच्या आधारावर खुल्या गटातून प्रवेश घेण्यासाठी त्यांना अखेरची संधी होती. मात्र, गुणवत्तेच्या आधारे २१३ पैकी सुमारे ७० ते ५० विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणे शक्य होते. मात्र, राज्य सरकारने प्रवेशासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश सोमवारी रात्री जारी करीत या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यांचे प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकार तांत्रिक मार्ग शोधत असून गरज पडल्यास वटहुकूम काढण्याची तयारीही राज्य सरकारने केली आहे.