होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा

राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा

Last Updated: Feb 26 2020 7:25PM
 

 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. याबाबतचे विधेयक आज, बुधवारी विधानपरिषेदत मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिली आहे. 

वाचा : सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभाध्यक्षांनी फेटाळला

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला आज विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत मराठी भाषा विषय  अनिवार्य करणारे विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. राज्यातील सर्व बोर्डातील शाळांना, केंद्र शासनाशी संलग्न शाळांना हा कायदा लागू असणार आहे.

ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून अजित पवार म्हणाले..

मराठी भाषा न शिकवणार्‍या शाळांची मान्यता रद्द होणार

महाराष्ट्रातील सर्व शिक्षण मंडळाच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा हा विषय अनिवार्य असेल. हा राज्याच्या मराठी भाषाविषयक धोरणाचा एक अविभाज्य भाग मानला जाईल. इंग्रजीसह सर्व भाषांतील शिक्षण मंडळांना त्यांच्या अभ्यासक्रम नियमांत मराठी भाषा विषय सक्तीचा असल्याची तरतूद करावी लागेल. अशा शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल. ना हरकत प्रमाणपत्र देऊन मराठी विषय न शिकवल्यास शाळांना सुरुवातीला दंडात्मक व नंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद केली जाणार आहे. यावर देखरेख करण्यासाठी विभागवार विशेष अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्य सरकारने केलेल्या कायद्याला न्यायालयात आव्हान देता येणार आहे किंवा अशा प्रकारचे आदेश मान्य करणे बंधनकारक नसेल.