Mon, Sep 16, 2019 12:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महायुतीतील मित्रांचा विधानसभेला सन्मान

महायुतीतील मित्रांचा विधानसभेला सन्मान

Published On: Mar 23 2019 7:21PM | Last Updated: Mar 23 2019 8:05PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच रालोआ आणि संपुआतील छोटे पक्ष आपल्या पदरात मोठे दान पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मित्रांसाठी 4 जागा सोडल्या आहेत. परंतु, भाजप-शिवसेनेने मित्र पक्षांसाठी जागा सोडलेली नाही. राज्यातील 48 पैकी सर्वच्या सर्व जागा भाजप आणि शिवसेना हे युतीतील दोनच पक्ष लढवणार आहेत. 

रामदास आठवलेंचा रिपाइं, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे युतीतील घटक पक्ष आहेत. सर्वच पक्ष लोकसभेसाठी जागांची मागणी करत होते. परंतु, त्यांना युतीत उमेदवारी न मिळाल्याने जानकर, मेटे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच कोल्हापूर येथे 23 रोजी होणाऱ्या युतीच्या संयुक्त प्रचारसभेत घटकपक्ष सहभागी होणार का याबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीतील सर्व घटक पक्षांचे नेते कोल्हापुरातील संयुक्त प्रचारसभेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. 

विधानसभेला सन्मान

युतीतील घटक पक्षांना लोकसभेसाठी जागा दिल्या नसल्या तरी विधानसभा निवडणुकीत त्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, रामदास आठवले हे महायुतीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. 

आघाडीकडून घटक पक्षांना चार जागा

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मित्रांसाठी चार जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2, बहुजन विकास आघाडीला एक आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासाठी एक अशा जागांचा समावेश आहे.