होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्तेसाठी समान किमान कार्यक्रम ठरणार; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून समित्या स्थापन 

सत्तेसाठी समान किमान कार्यक्रम ठरणार; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून समित्या स्थापन 

Last Updated: Nov 13 2019 1:16PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात सत्ता स्थापनेसाठी एकमेकांसोबत चर्चा करुन  समान किमान कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या समितीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचा समावेश आहे.

तर काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष समान किमान कार्यक्रम ठरवून त्यानंतरच पुढे जातील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी स्पष्ट केले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे वेगळ्या विचारधारेचे पक्ष आहेत. हे तीन पक्ष एकत्र कसे येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या संभाव्य आघाडीवर भाजपकडून टीकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी, काल बोलताना भाजपने अन्य राज्यांत केलेल्या आघाड्याही पाहाव्या लागतील, असा टोला लगावला होता. 

जम्मू- काश्मीरमध्ये भाजप आणि मेहबूबा मुफ्ती कसे एकत्र आले होते, बिहारमध्ये नितीशकुमार-भाजप एकत्र कसे आले, रामविलास पासवान-भाजपची मैत्री कशी झाली, चंद्राबाबू-भाजप एकत्र कसे आले होते, ही सगळी माहिती मी मागवली आहे. हे सगळे कोणत्या संगमावर एकत्र आले हे पाहून मग आम्ही भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ आणि सत्तास्थापनेसाठी दावा करू, अशा शब्दांत त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले होते.