Sun, Aug 18, 2019 06:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोबत या; अजित पवारांनी राज ठाकरेंना का दिली ऑफर?

सोबत या; अजित पवारांनी राज ठाकरेंना का दिली ऑफर?

Published On: Feb 12 2019 4:10PM | Last Updated: Feb 12 2019 4:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने मनसेला सोबत येण्याची ऑफर दिली आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले आहे.

राज ठाकरे यांच्यासह राजू शेट्टींचे मतभेदही दूर केले जातील, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी अनेकदा अजित पवारांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चित्र बदलले आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या भेटी घेतली असल्याचे समजते. छगन भुजबळ यांनीही कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. याआधी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

या सर्व घडामोडीवरून राष्ट्रवादी- मनसे एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू आहे. तर आता स्वतः अजित पवार यांनी राज ठाकरेंना सोबत येण्यासाठी ऑफर दिली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने समविचारी पक्षांना सोबत घेण्याची रणनिती आखली आहे.