Wed, Jul 15, 2020 17:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिल्लीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा अखेर पूर्ण; शिवसेनेशी चर्चेचा मुहूर्तही ठरला!  

दिल्लीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा अखेर पूर्ण; शिवसेनेशी चर्चेचा मुहूर्तही ठरला!  

Last Updated: Nov 21 2019 4:52PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

गेल्या दोन दिवसांपासून सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दिल्लीतील काथ्याकूट अखेर पार पडला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 

दिल्लीमधील बैठकींचा टप्पा पार पडल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उर्वरित चर्चा  उद्यापासून मुंबईत होणार असल्याचे चव्हाण म्हणाले. सर्व मुद्यांवर चर्चा पूर्ण चर्चा होऊन सहमती झाली आहे. आम्ही आता मुंबईला प्रयाण करणार आहोत. मुंबईत आल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करून शिवसेनेशी बोलणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

हा सर्व चर्चेचा टप्पा पार पडल्यानंतर तिन्ही पक्ष फॉर्म्युला काय असेल याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल असेही चव्हाण म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी (शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी) सरकार अस्तित्वात येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच दूर करण्यासाठी दिल्लीत आघाडीच्या नेत्यांनी तळ ठोकला होता. कालपासून प्रदीर्घ अशा बैठकांमधून महाविकास आघाडीला मूर्त स्वरूप आणि किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यासाठी खल सुरू होता.