होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Last Updated: Nov 08 2019 4:52PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. यामुळे राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीतच देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर सह्याद्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण राजीनामा दिल्याचे जाहीर केले. आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून तो राज्यपालांनी स्वीकारला, असे फडणवीस यांनी सांगितले. 

फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आपला राजीनामा सादर केला. 

गेल्या पाच वर्षात सर्व संकटांचा सामना केला. पाच वर्षे प्रचंड मोठी कामे केली. मात्र, निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कमी जागा मिळाल्या, असे फडणवीस यांनी सांगितले.  

24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी भाजपला 105 शिवसेनेला 56 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54, काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. या आकड्यानुसार भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसनेची मदत घेणे क्रमप्राप्त होते. पण, निवडणुकीपूर्वी युती केलेल्या शिवसनेने मुख्यमंत्रीपदाबरोबर सत्तेत वाटा मागितल्याने युतीत तणाव निर्माण झाला. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा देत हा तणाव संपवला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपनंतर आता शिवसेना हा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेला संख्याबळ सिद्ध करण्याचे आव्हान आहे. जरी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवण्याच्या अप्रत्यक्षरित्या तयारी दर्शवली असली तरी त्यांना तळ्यात मळ्यात असलेल्या काँग्रेसचा पाठिंबा मिळणार का हा प्रश्न आहे.