होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र मतदानयंत्रात बंद; मतदारराजाचा कुणाला कौल, कुणाचा लावणार निक्काल

महाराष्ट्र मतदानयंत्रात बंद; मतदारराजाचा कुणाला कौल, कुणाचा लावणार निक्काल

Published On: Apr 29 2019 6:14PM | Last Updated: Apr 29 2019 6:54PM
अभ्युदय रेळेकर

राज्यातील लोकशाहीचा उत्सव संपला

देशभरात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात लढाई हातघाईवर आली आहे. सुरुवातीचे चार टप्पे आजच पूर्ण झाले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील मतदान पूर्ण झाले. लोकसभेमध्ये राज्याच्या देशातील क्रमांक २ च्या जागा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राज्याला खूप महत्व आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक म्हणजेच लोकसभेच्या ८० जागा आहेत. तर  दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदार संघ आहेत. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवात महाराष्ट्राचा कल कुणाकडे आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. देशात सत्तेवर कोण येणार हे उत्तर भारतातील राज्ये सर्वसाधारणपणे ठरवत असली तरी राज्यातील निकालाचा परिणाम हा किंगमेकर ठरत आला आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज्यात एकूण ४ टप्प्यात मतदान झाले. यामध्ये ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदार संघात मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला राज्यात १० मतदारसंघात मतदान झाले. यामध्ये विदर्भातील राहिलेले मतदारसंघ तसेच राज्यातील मराठवाड्यातील काही मतदार संघांचा समावेश होता. राज्यात २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. यामध्ये राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील बहुतांश मतदारसंघांचा समावेश होता. राज्यात चौथ्या टप्प्यात शेवटचे मतदान २९ एप्रिलला झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील मतदारसंघ तसेच राज्यातील उरलेले, काही पश्चिम महाराष्ट्रातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश होता.

निकालापूर्वीची शांतता, २३ मे पर्यंत चर्चांना येणार उधाण

राज्यातील मतदारांनी या चार टप्प्यात आपला कौल मतदानयंत्रात बंद केला आहे. आता बाकीचे चार टप्पे पूर्ण होईपर्यंत राज्यात निकालापूर्वीची शांतता असणार आहे. या शांततेमध्येच मतदारांची चाचपणी करुन नेमक्या जागा कुणाला किती मिळणार याचा अंदाज आणि हिशेब जनता नेहमीप्रमाणे लावत राहीलच. त्याचबरोबर सत्तेच्या सोपानापर्यंत हे निकाल आपल्याला घेऊन जातील का, याची चाचपणी राज्यातील प्रमुख पक्ष करत राहणार हे निश्चित आहे. अनेकांनी एक्झिटच्या माध्यमातून या सगळ्याचा अंदाज घेतला असणारच आहे. मात्र थेट एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा खोडा असल्याने त्याला आणखी काही काळ थांबावे लागेल. देशात निवडणुकीचे अजून ४ टप्पे बाकी असल्याने एक्झिट पोल आताच प्रसिद्ध करु नये अशी निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिकाही रास्तच आहे.

मोदी लाटेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? 

यापूर्वी  २०१४ साली जेव्हा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी लाट होती. त्यावेळच्या निकालावरुनही सर्वांनाच ते मान्य करावे लागले. त्यावेळी भाजपने मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून वेळीच घोषित केले. मोदींनी जिवाचे रान करुन देशभर प्रचार केला. काँग्रेस राजवट उलथवून टाकण्यासाठी ज्या-ज्या प्रकारच्या घोषणा करता येतील, त्या-त्या प्रकारच्या घोषणा त्यांनी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी त्यावेळी केल्या. त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारने १० वर्षे पूर्ण केली होती. त्यामुळे जनतेमध्ये नैसर्गिक अशी अँटीइन्कंबन्सी तयार झाली होती. त्यातच काँग्रेस सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्याचे मोठे भांडवल मोदी लाट निर्माण होण्यासाठी झाले. त्यातच भाजपला विक्रमी जागा मिळाल्या. भाजपने ती निवडणूक एकट्याने लढली नव्हती. त्यावेळीही एनडीएच्या माध्यमातून भाजप एक प्रमुख पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होता. तरीही एकट्या भाजपची कामगिरी बहुमताचा आकडा ओलांडून १० जागा पुढे म्हणजे २८२ वर गेली होती. भाजपच्या नुसत्या जागाच वाढल्या नाहीत तर त्यांच्या मतांची टक्केवारीही वाढल्याचे दिसून आले. भाजपला ३१ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला १९.३ टक्के मते मिळाली. आधीच्या निवडणुकीशी तुलना करायची झाल्यास भाजपच्या मतांच्या टक्केवारीत १२.२ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर काँग्रेसची मतांची टक्केवारी ९.३ टक्क्यांनी घसरली. भाजपच्या जिंकून आलेल्या उमेदवारांची संख्या पाहिल्यास मतदारांनी अक्षरशः भाजपला डोक्यावर घेतल्याचा इतिहास २०१४च्या निवडणुकीत घडला. देशाला त्यानंतर धडाडीचे विनापाश असे नरेंद्र मोदींचे नेतृत्व मिळाले. 

मोदींच्या निर्णयाचे प्रतिबिंब निकालांमध्ये दिसणार

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक धडाडीचे निर्णय घेऊन त्यांची देशाच्या हितासाठी काहीही करण्याची निर्णयक्षमता दाखवून दिली. त्यांच्या काही निर्णयांचा जनतेला अतोनात त्रास झाला. मात्र देशहितासाठी काहीप्रमाणात त्रास सोसावा लागला तरी चालेल पण सरकार व्यापक लोकहितासाठी काही कठोर निर्णय घेत असेल तर त्याच्याबरोबर आपण उभे राहिले पाहिजे, अशीच जनतेची भावना प्रत्येकवेळी दिसून आली. मोदींनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत. त्यांच्या निर्णयामुळे जनता कशी होरपळून निघत आहे, असा प्रचार प्रत्येकवेळी विरोधकांनीही मोठ्या प्रमाणात केला. मध्यंतरी पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत त्याचे विपरित परिणामही भाजपला सोसावे लागल्याचे दिसले. मात्र मोदी त्यांच्या निर्णयापासून दूर हटले नाहीत. उलट जनतेच्या हिताचे अधिकाधिक  निर्णय घेण्यासाठी त्यांना बळच मिळत गेल्याचे दिसून येते.

आता मोदींची पाच वर्षे संपली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेच्या मनात आहे. त्यानुसार जनतेने यावेळी मतदान केले आहे. तसेच २०१४ साली जशी मोदी लाट होती, तशी लाट आत्ता आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे मागच्यावेळी मतदारांनी घेतलेला निर्णय हा संधी देण्यासाठीचा होता. आताचा निर्णय हा संधी दिल्यानंतर पाचवर्षे आजमावून मतदारांनी घेतला आहे. त्यामुळे मोदींना महाराष्ट्राच्या जनतेने पाच वर्षे आजमावून काय निर्णय दिला आहे, ते पाहणे २३ मे रोजी औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आत्ता मतदारांनी घेतलेला निर्णय केवळ भावनेच्यापोटी घेतलेला नसणार, तर गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीची पावती या स्वरुपातील असणार आहे हे लक्षात ठेवावे लागेल.

मतदानाला उन्हाच्या झळा, गडकरींचा गड पणाला

पहिल्या टप्प्यापासून या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा विचार केल्यास विदर्भात नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मतदान झाले. विदर्भात एप्रिल महिन्यातील तापमानाचा पारा टिपेला पोहोचण्यास सुरुवात झालेली असते. या परिस्थितीत यावर्षी मतदान झाले. सकाळी लवकर या भागात त्यामुळेच जोर जाणवला. दुपारी अत्यंत कमी प्रमाणात मतदान झाले. तर संध्याकाळी पुन्हा उन्हे खाली आल्यावर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. या सातही मतदारसंघांमध्ये मागच्यावेळी भाजप शिवसेनेने बाजी मारली. यामध्ये गडकरींसह पाच खासदार भाजपचे होते. तर दोन खासदार शिवसेनेचे होते. यावेळी यामध्ये भाजपच्या तिकिटावर मागच्यावेळी निवडून आलेले नाना पटोले यांनी पक्षाशी उभा दावा मांडून बाहेर पडणे पसंत केले. त्यांनी या निवडणुकीत तर थेट भाजपच्या गंडस्थळालाच हात घातला आहे. आपला भंडारा-गोंदिया मतदारसंघ सोडून त्यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणुकीत उडी घेतली. संघाचे मुख्यालय आणि नितीन गडकरींचा गड असलेल्या या मतदारसंघात पटोले यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले. त्यांचा टिकाव लागणार की गडकरी  गड राखणार याकडे नागपूरकरांचे लक्ष आहे. 

भंडारा गोंदियाची जागा सोडली तर सर्वत्र काँग्रेसचेच उमेदवार आहेत. त्यामुळे या टप्प्यात काँग्रेसची विदर्भातील ताकद आजमावली जाणार आहे. मतदार मागच्यावेळी जसा भाजप-शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला तसाच यावेळीही राहतो का, की मतांचे दान काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मोदी लाट नाही, याचा काहीसा फायदा काँग्रेसला होईल अशी परिस्थिती आहे. मात्र त्याचा मतदानावर कितपत प्रभाव आहे हे २३ तारखेलाच निश्चित होईल.  नाना पटोले यांच्याजागी उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांना मोठी आशा आहे. नागपुरात स्वतः पटोले यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. काँग्रेसचे माजी राज्यप्रमुख माणिकराव ठाकरे यांचीही प्रतिष्ठा पहिल्या टप्प्यातच मतदानयंत्रात पणाला लागलेली आहे.

प्रकाश आंबेडकरांची ताकद तरी किती...

या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही विदर्भातील तसेच मराठवाड्यातील काही मतदारसंघ समाविष्ट होते. या टप्प्यात १० मतदारसंघात मतदान झाले. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सवता सुभा मांडून प्रचाराचे रान पेटवले. या निवडणुकीत त्यांनी हिरीरीने उडी घेतल्याचे दिसले. त्यांची प्रतिष्ठा या टप्प्यात पणाला लागली. प्रकाश आंबेडकर हे या निवडणुकीत २ मतदारसंघातून उभे राहिले आहेत. या दोन्ही मतदारसंघात म्हणजे अकोला आणि सोलापूरमध्ये याच टप्प्यात मतदान झाले. दोन्ही ठिकाणी आंबेडकर यांनी चांगलाच जोर लावलेला दिसला. सोलापुरात त्यांच्यापुढे माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे आव्हान आहे. तर अकोल्यात मागच्यावेळी भाजपच्या संजय धोत्रे यांनी मैदान मारले होते. या निवडणुकीत आंबेडकरांनी वेगळी आघाडी करुन सवता सुभा मांडला. त्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांनी घेतली आहे. त्यांच्यापाठिमागे मोठा मतदार आहे असा त्यांचा दावा आहे. तो दावा किती खरा आणि किती खोटा हे या निकालानंतर दिसून येईल. तसेच आंबेडकरांच्या हाताशी किती जागा येतात, तसेच त्यांची ताकद ते कुणाच्या पाठीशी उभी करतात, यावर त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे दिसून येईल. या टप्प्यातल्या ८ जागा मागच्यावेळी भाजप-शिवसेनेच्या पारड्यात गेल्या होत्या. यावेळी मात्र मागच्यावेळसारखीच परिस्थिती राहील असे वाटत नाही. कारण सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती या ठिकाणी मागच्यावेळी भाजप शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. यावेळी त्या ठिकाणी विरोधकांनी तगडी लढत उभी केल्याचे मानण्यात येत आहे. त्याशिवाय अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना यश मिळते का याकडेही सर्वांचे लक्ष राहील.

सर्वाधिक इंटरेस्टिंग लढतींचा तिसरा टप्पा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघात मतदान झाले. तसेच मराठवाड्यातील राहिलेल्या आणि  कोकणातील दोन मतदारसंघांचा समावेश होता. राज्याचा विचार केल्यास सगळ्यात इंटरेस्टिंग लढती याच टप्प्यात झाल्या असेच म्हणावे लागेल. राज्यातल्या १४ मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. यातले मतदारसंघ पाहता बहुतांश मतदारसंघातील लढती चांगल्याच रंगणार असेच दिसते. मतमोजणीच्या दिवशी याच टप्प्यातील मतदारसंघातील निकालांवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. एकतर माढा आणि बारामतीतल्या लढतीमध्ये काय निकाल लागतो, याची उत्सुकता मोठी असणार आहे. या मतदारसंघांमध्ये पवार आणि मोहिते-पाटील घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतदार दान टाकतात की ‘आमचं ठरलंय’ला कोल्हापुरात प्रतिसाद मिळतोय याबाबतच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. अहमदनगरमध्ये थेट विरोधीपक्ष नेत्यांच्याच मुलाला पळवण्यात भाजपला यश आले. विरोधीपक्षनेतेही राजधर्म सोडून मुलाच्या प्रचाराला लागले. त्यांनी अखेर विरोधीपक्षनेतेपद सोडले. ते होणारच होते. मात्र हा जुगार त्यांना तारणार का, याकडे मतमोजणीदिवशी सर्वांचे लक्ष असणार हे निश्चित आहे. पुणे, सांगलीसह रावेर आणि जळगावच्याही लढती रंगतदार झाल्याचा अनुभव मतमोजणीला येईल असेच दिसते. रायगडमध्ये तटकरेंची तगडी लढत कितपत कामी येते तसेच हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींचा स्वाभिमान कायम टिकतो का हेही पाहावे लागेल.

शहरी मतदार कुणाच्या पाठीशी?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राज्याची राजधानी मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजेच ६ मतदारसंघ आणि राज्यात इतर राहिलेल्या ११ मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. यामध्ये मुंबईतील सहाही मतदारसंघात युती आणि आघाडीत चुरशीच्या लढती होणार असेच दिसत आहे. राज ठाकरे यांनी एकही उमेदवार उभा केला नसला तरी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात मोदीविरोधी वातावरण निर्माण करण्यात आघाडी घेतली. मोदींचा विरोध एवढा एकच एककलमी कार्यक्रम घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सभा गाजवल्या. 'ए, लाव रे तो व्हिडिओ' हे वाक्य प्रचारात परवलीचे वाक्य झाले होते. अर्थात याच व्हिडिओंना उत्तर देण्याचा प्रयत्नही भाजपने केला. मात्र या दोन्ही प्रकारच्या प्रचारामध्ये कोणता प्रभावी ठरला हे निकालानंतर स्पष्ट होईल. निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात प्रमुख लढतींमध्ये दक्षिण मुंबईत काँग्रेसच्या मिलींद देवरा यांच्या प्रचाराला थेट मुकेश अंबानींचा हातभार लागल्याने त्याचा कितपत परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उत्तर मध्य मुंबईत प्रिया दत्त विरोधात पूनम महाजन यांची लढत रंगतदार होईल असे दिसते. वायव्य मुंबईत हिंदी मतदारांचा टक्का संजय निरुपम यांना तारणार का, हे कळू शकेल. उत्तर मुंबईच्या निवडणुकीत काँग्रेसने मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला मैदानात उतरवल्याने प्रचारात चांगलीच रंगत आली होती. या मतदारसंघात पाचवेळा विजेता ठरलेल्या राम नाईक यांना काँग्रेसच्या गोविंदाने हरवले होते. यावेळी उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यात ही लढत महत्वाची मानली जात आहे. या लढतीच्या निकालाकडेही सगळ्यांचे लक्ष राहील यात शंकाच नाही. शेवटच्या टप्प्याचा आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे शहरी भागातील १२ मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे. त्यामुळे शहरी भागातील मतदार नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहेत. ते या टप्प्यातील निकालांवरुन स्पष्ट होणार आहे.

पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे राजकारण सुरू
 शेवटच्या टप्प्यातल्या मावळ आणि शिरुरमधील लढतीही सर्वांच्या लक्षात राहतील. यात मावळमध्ये शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ या निवडणुकीत मावळमधून लढत आहे. त्याचा निकाल ऐतिहासिक ठरेल. तसेच शिवबंधन तोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालल्या डॉ. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघतील मतदार स्वीकारतात का, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकशाहीच्या या महोत्सवी यज्ञात राज्यातील मतदारांनी आपल्या मताची समिधा टाकली आहे. आता याचे फलित कुणाला आणि कसे मिळणार याचा निकाल येत्या २३ मे रोजी हाती येईल.