मुंबई : प्रतिनिधी
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे काढण्यात आलेल्या हजारो शेतकर्यांचा मोर्चा 12 मार्च रोजी विधानभवनावर धडकणार आहे. हे शेतकरी अनेक मैल पायी चालत आले आहेत. या शेतकऱ्यांच्या नक्की मागण्या काय आहेत यावर एक प्रकाशझोत टाकूयात.
>सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2006 मध्ये कसेल त्याच्या नावावर वनजमीन करण्याचे निर्देश झाले आहेत. मात्र, या कायद्याची 12 वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही.
>यापूर्वीही शेतकर्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकला एक लाखाचा मोर्चा काढला होता, तरीही असंवेदनशील सरकारवर काही परिणाम झाला नाही.
>कर्जबाजारीपणामुळे सुमारे 75 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी वर्षांनुवर्ष आदिवासी शेतकरी कसून कुटुंबाचे गुजराण करीत आहे. मात्र, सरकार जमिनी नावावर करीत नाही. या जमिनी कष्टकर्यांच्या नावावर केल्या पाहिजेत, यासाठी दिल्लीत आठ ते दहा वेळा आणि मुंबईत विधान भवनावर हा दुसरा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मोर्चेकरी शेतकर्यांनी दिली.
>कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात.पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा.शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
>स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा.वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
लाल वादळ निघाले
हा लॉग मार्च नाशिक ते विधानभवनापर्यंत पायी काढण्यात आला असून मोर्चात 30 हजारांहून अधिक शेतकरी सामील झाले आहेत. शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील शेतकरी लालबावट्याच्या झेंड्याखाली मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यात लालटोपी, हातात लाल झेंडे, खिशाला पक्षाचे बॅच लावून शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव भिवंडी बायपासपासून या मोर्चात सहभागी झाले आहे. सोमवारी हे लाल वादळ विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे
गावोगावी स्वागत
लाँग मार्चचे मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर येणार्या गावाच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. लाँग मार्चमध्ये सामील झालेल्या शेतकर्यांनी आपल्या गावातून तांदूळ व शिधा सोबत आणला आहे. लाँग मार्चमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यात येत आहेत. चळवळीची गाणी गायली जात आहे. या मोर्चाचे नेतृत्व व नियोजन किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी. गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ.अजित नवले, सावळाराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, सिद्धप्पा कलशेट्टी, बारक्या मांगात, लडका कलिंगडा आदी करत आहेत.