Mon, Sep 16, 2019 06:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घर हिरावल्याने आदिवासी कुटुंब रस्त्यावर

घर हिरावल्याने आदिवासी कुटुंब रस्त्यावर

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 12:48AM
जव्हार : तुळशीराम चौधरी

वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर घर बांधल्याचा ठपका ठेवत यशवंत घाटाळ या आदिवासी बांधवाचे घर तोडून वनविभागाने त्या कुटुंबाला रस्त्यावर आणले आहे. या कारवाईमुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जव्हार वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडील वनक्षेत्र परिमंडळ जुनी जव्हार अंतर्गत गावं सर्वे नंबर 39 मध्ये जुनिजव्हार येथे यशवंत बाळू घाटाळ यांनी वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता विटामातीचे घर बांधले असल्याचे सांगत वनविभागाने घर जमिनदोस्त केले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वनविभागाने ही कारवाई केल्याने घाटाळ कुटुंब रस्त्यावर बेघर होऊन रस्त्यावर आले आहे. वनविभागाच्या नोटीसमध्ये गुन्हा कबूल केल्याचे लिहिले आहे, ते सर्व चुकीचे लिहिले आहे. आमच्या अशिक्षितपणाचा वनविभागाने गैरफायदा घेत कोर्‍या कागदावर सह्या, अंगठे घेवून आम्हाला बेघर केले आहे. त्यामुळे आमचे मोठी नुकसान झाली असून, आम्हला बेघर करणार्‍या वनविभागावर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करू, अशी माहिती पीडित कुटुंबाने दिली.

जुनी जव्हार गाव सर्व्हे नंबर 39 मध्ये जेथे घाटाळ कुटुंब राहत होते. तो वनप्लॉट घाटाळ यांच्या नावावर करण्यासाठी केलेला दावा हा जव्हारच्या प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून घाटाळ कुटुंब तेथे वास्तव्य करत आहे. त्यामुळे वनविभागाने केलेली कारवाई चुकीची आहे. तसेच वनप्लॉटचा दावा प्रलंबित असल्याने कोणतीही कारवाई करू शकत नाही. यासाठी वनविभागाने दिलेल्या नोटिसांनंतर उत्तर दिले आहे. मात्र, तरीही वनविभागाने कोणतीही शाहनिशा न करता केलेली कारवाई चुकीची असून न्याय मिळावा अशी अपेक्षा पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे.