Sat, Jul 04, 2020 10:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर 

ठाण्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर 

Last Updated: Jun 30 2020 7:28PM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा 

संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन होणार कि नाही याबाबतची असणारी उत्सुकता अखेर संपली आहे. २ जुलै सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलै सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन होणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील अद्यादेश ठाणे महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे. 

केवळ अत्यावश्यक सेवा वगळून सर्वप्रकारच्या सार्वजनिक आणि खाजगी वाहनांवर बंदी घालण्याबरोबरच अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांना देखील बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष करून सर्व हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम आणि उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई कारण्याचा इशारा ठाणे महापालिकेने दिला आहे.  

संपूर्ण ठाण्यात लॉकडाऊन होणार की केवळ हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन होणार यासंदर्भात गेले दोन दिवस चांगलीच चर्चा रंगली होती. लॉकडाऊन करायचे कि नाही याबाबत ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासनामध्ये सुद्धा एकमत होत नव्हते. सोमवारी ठाणे पोलिसांनी ट्विट करून संपूर्ण ठाण्यात लॉकडाऊन होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन होणार हे निश्चित मानले जात होते. दोन्ही यंत्रणांच्या गोंधळामुळे नागरिकांचा देखील गोंधळ उडाला होता, त्यामुळे नागरिकांनी देखील खरेदीसाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील दोन मंत्र्यांमध्ये देखील एकमत झाले नसल्याने सोमवारी लॉकडाऊन करण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकला नाही, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर  ठाणे पोलिसांनीही  पुन्हा ट्विट मागे घेतल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत हा संभ्रम कायम होता. मात्र मंगळवारी ठाणे महापालिकेने थेट अद्यादेश काढून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आयुक्तांना दिलेल्या अधिकारात नवा आध्यादेश काढून संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पुन्हा महापालिका आयुक्त विपिन शर्मा आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यात चर्चा होऊन या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार २ जुलैच्या सकाळी ७ ते १२ जुलै सकाळी ७ या कालावधीत संपूर्ण ठाणे  शहर बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

काय काय बंद राहणार  

- या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. 

 - शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व बंद राहणार  

-मॉर्निग वॉक आणि इव्हनींग वॉकवर बंदी तसेच कोणालाही विनाकारण घरा बाहेर पडता येणार नाही. 

-अत्यावश्यक, नाशवंत वस्तु वगळता इतर सर्व कारणांकरीता ठाणे महापालिका हद्ददीत लॉकडाऊन असणार आहे. 

-इंटरसिटी, एसएसआयटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी असणार नाही. 

-टॅक्सी, ऑटो, सर्व आंतराज्यीय बस, प्रवासी वाहतुक सेवा (खाजगी वाहनासह) खाजगी ऑपरेटरांकडून, कामकाज बंद असणार आहे.  

 -व्यावसायिक आस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम, सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद राहणार 

-सरकारी कार्यालये  कमीत कमी कर्मचाऱ्यांसह ऑपरेट करण्याची परवानगी असेल 

काय काय सुरु राहणार 

- दुध विक्रीची दुकाने, मेडीकल आणि डॉक्टरांचे दवाखाने सुरु राहणार आहे.

- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच ये जा करण्याची मुबा असणार . 

- बँका, एटीएम, इलेक्ट्रॉनिक, आयटी आणि आयटीईणस, टेलीकॉम, टपाल, इंटरनेट, आणि डेटासेवा, पुरवठा साळखी सुरु राहणार 

- जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक व उपलब्धता, कृषी वस्तू आणि उत्पादने आणि सर्व वस्तुंची निर्यात आणि आयात, अन्न, फार्मास्युटीक्लस आणि वैद्यकीय उपकरणे  यासह आवश्यक वस्तुंचे ई कॉर्मर्स,

पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापने, रुग्णालये, फॉर्मसी आणि ऑप्टीकलस्टोअर्स, फार्मास्युटीकल आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतुक सुरु राहणार

- पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, तेल एजेन्सी त्यांची गोदामे आणि त्यांची संबधींत वाहतुक कार्ये केवळ अत्यावश्यक पास धारकांसाठीच सुरु राहणार 

- सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या  संस्थां कार्यरत राहणार

-  कोवीड १९ च्या नियंत्रणासाठी सहाय्य करण्या सेवा सुरु राहणार 

-मध्यविक्रीची दुकाने केवळ होम डिलीव्हरी सुरु राहणार.