Sun, Jul 05, 2020 13:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोविडच्या मृतदेहा शेजारी रुग्णांवर उपचार; हायकोर्टाकडून गंभीर दखल

कोविडच्या मृतदेहा शेजारी रुग्णांवर उपचार; हायकोर्टाकडून गंभीर दखल

Last Updated: Jun 04 2020 10:08PM

file photoमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात कोविडच्या मृतदेहाशेजारी रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच कोविड व्यतिरिक्त अन्य रुग्णांना खाटा, रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात याव्यात, लॉकडाऊनची काही भागात काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांची अथवा केंद्रीय पथकाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात यावी, अशी विनंती करणार्‍या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या वतीने जेष्ठ वकिल अ‍ॅड. राजेंद्र पै, अॅड. अमित मेहता आणि ओंकार खानविलकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर दिपांकर दत्ता यांच्या न्यायमुर्ती ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठा समोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. यावेळी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात कोविडच्या मृतदेहाशेजारी रुग्णांना उपचार केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांसह दोन तज्ज्ञ डॉक्टर, दोन अधिकाऱ्यांची विशेष समिती गठीत करुन चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांच्यावतीने करण्यात आली. त्याची दखल घेत राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

ई-शिक्षणासाठी नव्याने याचिका करण्याची मूभा 

दरम्यान, टाळेबंदीमध्ये राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी ई-लर्निंगसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे राज्य शिक्षण विभागाला निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यावर स्वतंत्र याचिका करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना यावेळी देण्यात आली.