Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना १० हजार पेन्शन 

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना १० हजार पेन्शन 

Published On: Jun 13 2018 6:50PM | Last Updated: Jun 13 2018 6:50PMमुंबई : प्रतिनिधी

आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रतिमहा १० हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रति महा ५ हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक १० हजार, व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस ५ हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक ५ हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल.