Sun, May 31, 2020 10:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युती-आघाडीचे राजकारण अटळ! पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण 

पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण; राज्यात अटीतटीच्या लढतीची चिन्हे

Published On: May 04 2018 8:30AM | Last Updated: May 04 2018 5:18PMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारविषयी नाराजी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती, असा सूचक कौल महाराष्ट्राने दिला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांची ही ‘इमेज’ भारतीय जनता पक्षासाठी निर्णायक ठरेल. दैनिक ‘पुढारी’ने घेतलेल्या राज्यव्यापी ‘महा’सर्वेक्षणाचे हे आणि असे अनेक निष्कर्ष धक्का देणारे, नव्या वाटा दाखविणारे आणि आणि सत्तेच्या राजकारणाची नवी मांडामांड करणारेही ठरावेत. ‘आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असावा’, या प्रश्‍नावर 25 टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांना बहुमताचा कौल दिला. त्याचवेळी ‘महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का?’ या थेट प्रश्‍नावर फडणवीस सरकारला सरळ अल्पमतात ढकलत 61 टक्के मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. ‘विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला मत द्याल’, या कळीच्या प्रश्‍नावर भारतीय जनता पक्ष 27 टक्के मते घेऊन पहिल्या क्रमांकावर, तर 25 टक्के मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिली. शिवसेना आणि काँग्रेस 17 टक्के मतांनी तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

विधानसभा निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. शिवाय, लोकसभा-विधानसभेच्या एकत्रित निवडणुकांचे पडघमदेखील आतापासून वाजू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दैनिक ‘पुढारी’ने महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्यासाठी हे ‘महा’सर्वेक्षण केले. महाराष्ट्राच्या तब्बल 25 जिल्ह्यांत हे ‘महा’सर्वेक्षण करण्यात आले. 1,200 गावांपर्यंत हे सर्वेक्षण पोहोचले आणि जवळपास 25 हजार मतदारांनी आपली मते यात नोंदविली. या अर्थाने महाराष्ट्र पिंजून काढणारा हा पहिलाच असा राजकीय सर्व्हे ठरावा. 

नेमके प्रश्‍न घेऊन ‘पुढारी’ने केलेले हे ‘महा’सर्वेक्षण अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरावे. ‘महाराष्ट्र आज-उद्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाकडे पाहतो’, या प्रश्‍नाचे उत्तर या सर्वेक्षणाने दिलेच. याशिवाय भाजप, शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या सत्तेच्या दावेदारांची नेमकी जागा कोणती, हेही दाखवून दिले. भाजपनंतर मतदारांची दुसरी पसंती राष्ट्रवादीला आहे. धड विरोधात नाही अन् धड सत्तेतही... अशी भूमिका घेतल्याचा शिवसेनेला तोटाच झालेला दिसतो. भाजप, राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना व काँग्रेस आहेत. 

वाचा: ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण’ या प्रश्‍नावर भाजप-शिवसेना सरकारबद्दल बहुमताने नाराजी व्यक्त करतानाच 25 टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. ‘सिंचन घोटाळ्या’चा आरोप असूनही अजित पवार दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. पृथ्वीराज चव्हाण 11 टक्के मतदारांना मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून 9 टक्के मतदारांनी पसंती दिली. पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांना प्रत्येकी फक्त 5 टक्के मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. ‘मुख्यमंत्री कोण’, या प्रश्‍नाच्या उत्तरात अशी जी अनेक उत्तरे मतदारांनी या सर्वेक्षणातून दिली, त्यातून अनेक प्रश्‍न मात्र उभे राहतात. या सर्वेक्षणात विदर्भ विभागाचा समावेश नव्हता, तरीदेखील मुख्यमंत्री फडणवीस अग्रस्थानी आहेत. याचा अर्थ फडणवीस यांनी राज्यात सर्व भागांत आपला प्रभाव निर्माण केला आहे, तर मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील इतरांचे नेतृत्व आपापल्या प्रभाव क्षेत्रात मर्यादित असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. काँग्रेसला आपल्या परंपरागत मतांबाबत आत्मपरीक्षण करावे लागणार, असे दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मोदी फॅक्टर’ तेवढा प्रभावी ठरणार नाही, असा बहुसंख्य मतदारांचा कल आहे. ‘काही सांगता येत नाही’, हा पर्याय निवडणार्‍या मतदारांची संख्या तब्बल 28 टक्के असली, तरी ‘मोदी फॅक्टर’ तितकासा प्रभावी ठरणार नाही, असे 47 टक्के मतदार म्हणतात. 

वाचा : कौल मराठी मनाचा: आता फडणवीस फॅक्टर! 

याचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे मुख्यमंत्री म्हणून स्वतःची स्वतंत्र इमेज निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी ठरलेले दिसतात. दुसरा अर्थ मोठा गर्भित आहे. तो म्हणजे, मागच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही जिंकलात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे. आता मात्र तुम्हाला तुमचे काम दाखवले, तरच मते मिळतील. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून बहुमताची पसंती देताना त्यांच्याच सरकारवर आम्ही समाधानी नाही, असे सांगणारा ग्रामीण आणि शहरी टक्का मोठा आहे, हे येथे विसरता येत नाही. 

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: लोक सरकारवर नाराज; पण...

सत्तेच्या म्हणजेच निवडणुकीच्या राजकारणात क्रमांक एकचा नेता म्हणून पहिली पसंती फडणवीस यांना या सर्वेक्षणातून मिळाली आहे. शिवाय, ‘सरकारातील सर्वात प्रभावी मंत्री कोण’, या प्रश्‍नाच्या उत्तरातही मुख्यमंत्र्यांचे नाव आहे. त्याबरोबर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पसंती मिळाली आहे. पुढील वर्षभर राजकीय, सामाजिक समीकरणे अशीच राहिली आणि मतदारांनी सरकारवर व्यक्त केलेली नाराजी फडणवीस दूर करू शकले, तर ‘पुढारी’च्या या ‘महा’सर्वेक्षणातील चित्र हेच आगामी निवडणूक निकालांचे चित्र असू शकेल.

वाचा: ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

अटीतटीच्या लढतीची चिन्हे

प्रत्येक पक्षाला आगामी निवडणुकीसाठी मिळणारी पसंतीची मते लक्षात घेता, भाजप-शिवसेना यांची युती झाली, तर युतीला यशाची आशा अधिक आहे. भाजपला 27 आणि शिवसेनेला 17 टक्के मतदारांचा पाठिंबा लक्षात घेतला, तर युतीला 44 टक्के मते मिळू शकतात आणि युती प्रथम क्रमांकावर येऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 25 आणि काँग्रेसला 17 टक्क्यांची पसंती आहे. ही बेरीज 42 टक्के होते. म्हणजे युती आणि आघाडीतील मतांचा फरक अगदी अल्प आहे. शिवाय, शिवसेनेने स्वबळाचा नारा लावला, तर भाजपपुढे पेच उभा राहू शकतो. पुन्हा ‘मनसे’मुळे कोणाचा फायदा आणि नुकसान होणार, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याचीच चिन्हे या ‘महा’सर्वेक्षणातून पुढे येत आहेत.

भूमिका

‘पुढारी’ हा कायम जनतेचा आवाज म्हणून पुढे आलेला आहे. अशा वेळी हा आवाज बुलंद करण्याचा नवा प्रयोग म्हणजे ‘कौल मराठी मनाचा!’ महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत प्रथमच गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाचे सरकार आहे. अशा वेळी जनतेच्या मनात नक्की आहे तरी काय, हे शोधणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘पुढारी’चा विशेष प्रभाव असणार्‍या महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांत आपले खेडोपाडी पसरलेले वार्ताहरांचे नेटवर्क वापरून महाराष्ट्राचा कानोसा घ्यायचे आम्ही ठरवले. ‘बिग डाटा अ‍ॅनॅलिटिक्स’सारख्या नव्या तंत्राची त्याला जोड दिली. जगभरात गाजणारे हे तंत्रज्ञान आता ‘पुढारी’ वापरत आहे. या निमित्ताने समोर आलेले निष्कर्ष हे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे आहेत. यातून महाराष्ट्राचा विशेषतः ग्रामीण भागाचा आवाज प्रतिबिंबित झाला आहे. यापुढेसुद्धा ‘पुढारी’ ‘समाजाच्या भल्यासाठी जागतिक तंत्रज्ञान’ या भूमिकेद्वारे नवनवे प्रयोग करत राहील. ‘पुढारी’चे वाचक या नव्या प्रयोगाचा स्वीकार करतील, याची खात्री आहे.  - डॉ. योगेश जाधव, व्यवस्थापकीय संपादक, दै.‘पुढारी’
 

Tags : survey2018, Kaul Marathi Manacha, daily pudhari, abp majha, survey, maharashtra, politics