Sun, Jul 05, 2020 13:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात २४३६ रुग्णांची वाढ, एकूण बाधित ५२ हजारांच्या पुढे

राज्यात २४३६ रुग्णांची वाढ, एकूण बाधित ५२ हजारांच्या पुढे

Last Updated: May 25 2020 7:55PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या सोमवारी 52 हजार 667 झाली आहे. दिवसभरात  आणखी 2 हजार 436 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे रुग्णांची झपाट्याने होणारी वाढ सुरूच आहे. दरम्यान, दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू झाला. 

राज्यात सोमवारी 1,186 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 15 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या 35 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

दिवसभरात ज्या 1,186 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक 900 रुग्ण मुंबई मंडलातील  आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 501, ठाणे 337, पालघर 16, रायगड 46, नाशिक 4, जळगाव 3, पुणे 109, सोलापूर 2, कोल्हापूर 3, सांगली 3, रत्नागिरी 9, औरंगाबाद 94, जालना 2, हिंगोली 1, लातूर 10, उस्मानाबाद 2, अकोला 17, अमरावती 4 आणि नागपूरमधील 23 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52 हजार 667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 30 हजार 247 लोक होम क्‍वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 479 लोक संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये आहेत.

सोमवारी 60 कोरोनाबाधित रुग्ण दगावले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1,695 झाली आहे. मुंबईमध्ये 38, पुण्यात 11, नवी मुंबईत 3, ठाणे शहरात 2, औरंगाबाद शहरात 2, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, रत्नागिरी जिल्ह्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. याशिवाय बिहारमधील एका व्यक्‍तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. मृत्यूंपैकी 42 पुरुष, तर 18 महिला आहेत.