Sat, Jul 04, 2020 18:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील संकटांची मालिका सुरुच; आता विविध विभागातून गॅस गळतीची तक्रार!

मुंबईतील संकटांची मालिका सुरुच; आता विविध विभागातून गॅस गळतीची तक्रार!

Last Updated: Jun 07 2020 8:33AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील अनेक भागात बीएमसी आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये अनेकवेळा रिंग वाजायला सुरु झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले. घाटकोपर, पवई, विक्रोळी आणि चेंबूर भागातील नागरिकांनी फोन करून त्यांच्या भागात गॅस गळती होत असल्याचे सांगितले. अत्यंत शिताफीने या भागांमध्ये अग्निशमन दलाची वाहने पाठविण्यात आली. गॅस गळती झाली की त्यामागील कारण काही अन्य कारणे आहेत? हे अद्याप समजू शकले नाही.

मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, 'आम्हाला मुंबईतील काही भागांतून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. घाटकोपर, विक्रोळी, पवई व्यतिरिक्त पंतनगर भागात गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या. पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत नमूद केलेल्या ठिकाणी गॅस गळतीची नोंद झालेली नाही.

त्याचवेळी, बीएमसीने बाधित भागातील लोकांना सांगितले की त्यांनी घाबरून जाऊ नये. परिस्थिती नियंत्रणात असून गॅस गळतीचे कारण व स्त्रोत याचा शोध घेण्यात येत आहे. अग्निशमन दलाची १७ वाहने घटनास्थळी हजर आहेत आणि खबरदारी घेण्याची गरज आहे. जर आपल्याला काही वास येत असेल तर, ओल्या टॉवेल किंवा कपड्याने नाक झाकून घ्या.

शिवसेना नेते आमि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केले. ते म्हणतात,  गॅस गळती झाल्याच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलाची टीम संबंधित भागात पोहोचली आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही. प्रत्येकाने घरामध्येच राहावे आणि खिडक्या बंद केल्या पाहिजेत.

महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'रात्री दहाच्या सुमारास मुंबईतील अनेक भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या. आपत्कालीन टीम त्या भागात पोहोचली आहे. आम्ही पाईपलाईन यंत्रणा तपासत आहोत आणि आतापर्यंत नुकसान किंवा गळतीची कोणतीही तक्रार मिळालेली नाही.