Sun, Jul 05, 2020 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव ठाकरेंकडून रेल्वेची मागणी, लगेच रेल्वेमंत्र्यांकडून आव्हान, नंतर संजय राऊतांचा खोचक टोमणा!

उद्धव ठाकरेंकडून रेल्वेची मागणी, लगेच रेल्वेमंत्र्यांकडून आव्हान, नंतर संजय राऊतांचा खोचक टोमणा!

Last Updated: May 25 2020 10:20AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी महाराष्ट्राने दररोज 80 रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वेकडून फक्त 40 रेल्वे  सोडण्यात येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादात सांगितले. त्यानंतर संध्याकाळी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देत सोमवारपासून दररोज 125 श्रमिक ट्रेन देण्याची रेल्वे मंत्रालयाची तयारी आहे, असे सांगितले. मात्र, त्यासाठी राज्यातील स्थलांतरीत मजुरांची यादी राज्य शासनाने दीड तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे द्यावे असे ट्विट केले. परंतु रात्री उशिरापर्यत राज्य सरकारकडून मजुरांची कोणतीही यादी आली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

पीयुष गोयल यांनी  आपल्या ट्विटमध्ये उद्धवजी आशा आहे तुम्ही स्वस्थ असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे, असे तुम्ही सांगितले. तुम्ही ही यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असेही गोयल यांनी सांगितले.

राज्याकडून मात्र रात्री उशिरापर्यत मजुरांची कोणतीही यादी रेल्वेप्रशासनाकडेपाठविण्यात आली नसल्याची रेल्वेने रात्री उशिरा काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे. श्रमिक ट्रेनचे नियोजन करण्यासाठी काही कालावधी लागतो,त्यामुळे मजुरांची यादी आधी मिळणे आवश्यक असते असेदेखील  रेल्वेने त्यात म्हटले आहे. दरम्यान, आम्ही यादी दिली आहे. फक्त गोरखपूरला जाणारी ट्रेन ओडिशाला मात्र जाऊ  देऊ  नका असा टोला शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊ त यांनी लगावला आहे. 

नियोजन केलेल्या 65 श्रमिक ट्रेन यापूर्वी रद्द

रेल्वेने राज्यातून नियोजित केलेल्या 65 श्रमिक रेल्वे राज्य सरकारला पुरेशी तयारी करण्यासाठी यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या आहेत. कारण पश्चिम बंगाल,झारखंड,केरळा,ओडिशा,राजस्थान या राज्यांनी श्रमिक रेल्वेला परवानगी देण्यास टाळाटाळ केल्याने त्या रद्द कराव्या लागल्या होत्या.

रेल्वेची तयारी

अडकलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने येत्या 10 दिवसात अतिरिक्त 2600 श्रमिक रेल्वे चालविण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.त्यातून सुमारे 36 लाख मजुरांची घरवापसी केली जाणार आहे. श्रमिक रेल्वे वाढविण्यासाठी रेल्ेवने 5 हजार पैकी 3 हजार आयसोलेशन कक्षाचे रुपांतर साध्या कोचमध्ये केले आहे.