होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पलूस-कडेगावची पोटनिवडणूक जाहीर; पालघर, गोंदियातही मतदान

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक जाहीर; पालघर, गोंदियातही मतदान

Published On: Apr 26 2018 5:47PM | Last Updated: Apr 26 2018 5:47PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

पालघर आणि गोंदिया येथील लोकसभा मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या दोन लोकसभेच्या जागांसोबतच पलूस-कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या तिन्ही ठिकाणी 28 मे रोजी मतदान होणार आहे. तर 31 मे रोजी निकाल जाहीर होतील. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची ही पहिली कसोटी असणार आहे. पालघर आणि गोंदिया या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत विजय मिळवणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. 

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. तर गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पराभवाच्या भितीने भाजप येथील पोटनिवडणूक घेत नसल्याचा आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहले होते. 

पतंगराव कदमांच्या मतदारसंघात देखील पोटनिवडणूक 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पलूस मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी निधन झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. 


Tags : by elections, Bhandara Gondia, Palghar