Sun, May 31, 2020 08:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएसएमटीचा पादचारी पूल कोसळून पाच ठार (Video)

सीएसएमटीचा पादचारी पूल कोसळून पाच ठार (Video)

Published On: Mar 14 2019 7:57PM | Last Updated: Mar 15 2019 1:45AM
मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनलगत डी. एन. रोडवरून जाणार्‍या जुन्या पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी रात्री 7.30 वाजता अचानक कोसळून पाच जण ठार तर, 34 जण जखमी झाले. ऐन वर्दळीच्या वेळेसच हा प्रकार घडला. जखमींना तातडीने जेजे हॉस्पिटलसह जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथून टाइम्स ऑफ इंडिया, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई पोलीस मुख्यालय, कामा हॉस्पिटल, जी. टी. हॉस्पिटल, आझाद मैदान पोलीस स्टेशन व मेट्रो सिनेमाकडे जाण्यासाठी डी. एन. रोडचा हा एकमेव पादचारी पूल आहे. त्यामुळे या पुलावरून दररोज 40 ते 50 हजार पादचारी ये-जा करतात. सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास या पुलावर मोठी गर्दी असते. साडेसात वाजता पूल कोसळला तेव्हा पुलावरून जाणार्‍या पादचार्‍यांची कमी वर्दळ होती. एवढेच नाही तर सिग्‍नल लागल्यामुळे डी. एन. रोडवर गाड्यांची संख्याही कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहेत.

पूल कोसळला तेव्हा जोरदार आवाज झाला. त्यामुळे पदपथावर चालणार्‍या पादचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत, अग्‍निशमन दल व पोलिसांना पाचारण केले. अवघ्या 15 मिनिटांत येथे अग्‍निशमन दलासह एनडीएचे जवान पोहोचले. तातडीने मदतकार्य सुरू करून, जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. हा पूल मध्य रेल्वे व मुंबई पालिकेचा आहे; मात्र त्याची देखभाल महापालिकेकडेच आहे. अलीकडेच या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले होते. यात या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार पुढील आठवड्यात पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात येणार होता; पण त्यापूर्वीच या पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला देणार्‍या सल्लागारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दुर्घटनास्थळी भेट घेऊन, पाहणी केली. यावेळी त्यांनी हा पूल रेल्वे व पालिकेचा होता का, तो कोणी बांधला होता, दुर्घटनेचे नेमके कारण, या दुर्घटनेला दोषी कोण, याची सात दिवसांत चौकशी करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेची रेल्वे व महापालिका संयुक्‍त चौकशी करतील, असेही त्यांनी जाहीर केले. 

 रेल्वे टर्मिनसहून क्रॉफर्ड मार्केट किंवा पालिका मुख्यालयाकडे जाणार्‍या या पादचारी पुलाचा काही भाग गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास असा सरळ रस्त्यावर कोसळला.

 सुदैवाने रेड सिग्नल असल्यामुळे वाहने दोन्ही बाजूंनी थांबलेली होती. त्यामुळेच मोठी मनुष्यहानी टळली. हा सिग्नल पडण्यापूर्वीच पूल कोसळला. 

 पूल कोसळला ती वेळ प्रचंड वर्दळीची आणि घरी जाण्याची असते. पुलाचा 60% भाग कोसळल्याने मागचे मागेच थांबले आणि या भागात असलेले पादचारी रस्त्यावर आपटले.

 1988 सालच्या या पुलाचे ऑडिट मुंबई महापालिकेने केले होते. त्यानंतर चुकीचा अहवाल देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी सांगितले. 

 या दुर्घटनेस महापालिकाच जबाबदार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. हा पूल रेल्वेचा नाही. हा शुद्ध पादचारी पूल असून, देखभालीसह त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवरच होती.