Sat, Sep 21, 2019 07:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्‍लॉग : पुरोगाम्यांनो उघडा डोळे, वागा नीट !

ब्‍लॉग : पुरोगाम्यांनो उघडा डोळे, वागा नीट !

Published On: Jul 10 2018 10:38AM | Last Updated: Jul 10 2018 10:39AMदत्तकुमार खंडागळे

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणारा वाघमारे पोलिसांना सापडला. "माझ्या धर्माचे रक्षण करण्यासाठी मी गौरी लंकेशचा खून केला !" असे वाघमारेने पोलिसांना सांगितले आहे. या हत्येच्या कटाचे धागेदोरे पाक पुण्यापर्यंत आले आहेत.  जातीयवाद्यांचा एक तळ पुण्यात पेशवाईपासून आहे. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. खरेतर छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुलेंच्या चळवळीचा वारसा लाभलेले पुणे शहर जातीयवाद्यांचा अड्डा व्हावे ही शोकांतिका आहे. मुद्दा पुण्याचाच नाही तर समाजात वेगाने फैलावणार्‍या विषारी जातीयवादाचा आहे. येणाऱ्या काळात या जातीयवादाचा समाजाला सक्षमपणे मुकाबला करावा लागेल. डोळसपणे ही विषारी प्रवृत्ती ओळखावी लागेल. कारण जातीयवादाचे व धर्मवादाचे विष पाक तळापर्यंत भिनले आहे. बारा-तेरा वर्षाची पोरं या विषारी प्रचाराला बळी पडताना दिसत आहेत. 

धर्माने माजलेला कसाब आणि नथूराम गोडसे एकाच लायकीचे आहेत. फक्त एक स्वदेशी आहे आणि एक शत्रू राष्ट्रातला आहे. पण दोघांची प्रवृत्ती सारखीच. त्यातही फरक करावयाचा झाला तर कसाबने खाल्ल्या ताटात घाण केली नाही. त्याने त्याच्या देशाच्या शत्रू राष्ट्रावर हल्ला केला. नथूराम गोडसेचे मात्र वेगळे आहे. देशांतर्गत वाढणारी गोडसे प्रवृत्ती याच लायकीची आहे. ती आपल्याच लोकांच्या जीवावर उठणारी आहे. या बांडगूळांच्यात इतका दम नाही की ते काश्मिरमध्ये किंवा पाकिस्तानात जावून इस्‍लामी दहशतवादाला उत्तर देवू शकतील. इस्‍लामी दहशतवादाची किंवा धर्मांधपणाची ढाल करत या विकृती देशातच धुडगूस घालत आहेत. स्वकीयांचेच बळी घेत आहेत. एखाद्या कुत्र्याला बाहेर दगड मारला तर ते पळत जातं, स्वत:च्या मालकाच्या घरात शिरतं अन घराच्या इलाक्यातून भुंकू लागतं. जिथे दगड मारला जातो तिथेच भुंकायची त्याची औकाद नसते. गोडसेवादी बांडगुळं त्यातलीच आहेत. त्यामुळे ही बांडगुळं कसाबच्याही लायकीची नाहीत. शत्रू राष्ट्रात जावून दहशतवाद किंवा देशभक्ती दाखवण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. ते इथेच आपल्या लोकांना त्रास देत राहतात. समाजाची दिशाभूल करत राहतात.

सध्या अशा विकृत आणि धर्मांध प्रवृत्तींचा जोर वाढतो आहे. धर्मांध मुस्लिम काय आणि धर्मांध "ब्राम्हण्य" वादी काय दोघांचाही मानवतेला धोकाच आहे. एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ आहे. त्यामुळे स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍याची जबाबदारी अधिक वाढते आहे. देशभरात ही विषारी विकृती का फैलावली आहे ? ती का बळावते आहे ? याचे मूलभूत चिंतन पुरोगामी मंडळींना करावे लागेल. दांभिकपणा सोडून डोळ्यावरची झापडं दुर करावी लागतील. सभा-संमेलनातील भाषणबाजी आणि पुरोगामित्वाची नौटंकी सोडून वास्तवाकडे डोळे उघडून बघावं लागेल. वास्तव समजून घेत निट वागावं लागेल. म्हणूनच "पुरोगाम्यांनो उघडा डोळे, वागा नीट !"  नाहीतर काळ माफ करणार नाही. 

अनेक पुरोगामी सभा-संमेलनात बोलतात एक अन प्रत्यक्षात जगतात एक. पुरोगामित्वाचा दंभ मिरवला जातो पण पुरोगामित्व जगले जात नाही. अनेकांची ही तर्‍हा आहे. सध्या पुरोगाम्यांच्यातला जातीयवाद पाहिला की लाज वाटते. खरेतर पुरोगाम्यांचा हा जातीयवाद नाही तो जातीय 'माज' आहे. या मंडळींच्याकडे कुठला 'वाद' नाहीच, आहे तो 'माज' आणि परस्परांच्यात वाद. पुरोगाम्यांच्या जातीय माजाने पुरोगामी विचारांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. यातही पुरोगामी विचार प्रत्यक्ष जगणारी प्रामाणिक माणसं आहेत पण त्यांची संख्या दुर्मिळ होत चालली आहे. नौटंकीबाजांची चलती जोरात आहे. स्वत:च्या बहिणीचे लग्न धनगर समाजाच्या युवकाशी लावून देत पुरोगामित्वाचे आचरण काय असते ? हे छत्रपती शाहू राजांनी समाजाला दाखवून दिले. त्यामुळेच महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र अशी निर्माण झाली. आज मात्र यापेक्षा वेगळी स्थिती आहे. 

स्वत:ला पुरोगामी म्हणवणारांच्या मनातील जाती-पातीच्या भिंती घट्ट आहेत, बलदंड आहेत. कुठला पुरोगामी अधिक चांगला किंवा आपला ते त्याच्या जातीवरून ठरते. म्हणजे मराठा पुरोगामी आधी मराठा असतो मग पुरोगामी असतो. बौद्ध पुरोगामी आधी बौद्ध असतो मग पुरोगामी असतो. ओबीसी पुरोगामी आधी ओबीसी असतो मग पुरोगामी असतो. पुरोगामित्वाचा विचार प्रत्यक्ष जगण्यापेक्षा सभा-संमेलनात भाषणं ठोकण्यात, पुरस्कारांच्या शिल्डनी घराचा हॉल सजवण्यात सत्तर वर्षे गेली. ही मंडळी स्वत:ला मिरवत बसली. स्वत:च्या कौतुकाच्या सोहळ्यात सजत बसली. त्यांनी मिरवा-मिरवीच्या नादात कला-कलाने वाढणार्‍या जातीयवादाकडे दुर्लक्ष केले, डोळेझाक केली. त्याच दुर्लक्षाची फळे आज समाज भोगतो आहे. त्यामुळेच नागपूरच्या 'भागवत' पुराणाचे प्रस्थ वाढले, गावा-गावात भागवत पुराणाच्या शाखा आणि पारायणे सुरू झाली. बहूजन समाजाचे महापुरूष यासाठी भांडवल म्हणून वापरले. याच काळात पुरोगामी विचाराची पाळमुळं खणून काढली गेली. इकडे पाळंमुळं खणली जात असताना पुरोगामी मंडळी सभा-संमेलनात मिरवण्यात मस्त होती. आजही फारसं चित्र बदलले आहे असे वाटत नाही. छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुलेंचा, राजर्षी शाहू राजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, संत गाडगेबाबांचा व क्रांतिसिंह नाना पाटलांचा महाराष्ट्र आज जातीयवाद्यांच्या मगरमिठीत आहे. 

क्रांतीअग्रणी जी.डी बापू लाड पाचवी-सहावीला होते तेव्हा म्हणजे १९३० साली दांडेकर गुरूजी त्यांना सांगायचे की, "आपला शत्रू इंग्रज नव्हे तर मुसलमान आहे !" दांडेकर जी.डी बापूंच्या कुंडल गावात संघाची शाखा चालवायचे. आज २०१८ साली संभाजी भिडे हेच सांगताहेत. "दांडेकर गुरूजी ते भिडे गुरूजी" हा प्रवास गेली ८८ वर्षे सातत्याने सुरूच आहे. प्रतिगामी मंडळी त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहेत. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. पुरोगामी मात्र दांभिकपणात अडकले आहेत. त्यांनी नव्या पिढीला महात्मा फुले, शाहू महाराज, क्रांतिसिह नाना पाटील, कर्मवीर अण्णा किंवा गाडगे बाबा सांगितले नाहीत, समजावले नाहीत. फक्त आनंदाचे आणि पुरस्कार वितरणाचे सोहळे साजरे करत बसले, भाषणं ठोकत बसले. तुम्ही भाषणं ठोका आम्ही जातीयवादाची पाचरं ठोकतो या खाक्याने प्रतीगामी मंडळी राबत राहिली. 

आज त्याच जातीयवादाच्या पाचराचे मुसळ झाले आहे. म्हणूनच पुरोगामी मंडळींनी ढोंगबाजीतून, जातीय माजातून बाहेर यायला हवे. कौतुकाचे सोहळे बंद करून समाजाला, नव्या पिढीला पुरोगामी विचार समजून सांगायला हवा. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिह नाना पाटील, संत गाडगे बाबा, कर्मवीर अण्णा समजून सांगायला हवेत. नाहीतर वाघमारे गोळ्या घालायला सक्षम आहेच. आता कुणी नथूराम गोडसे गोळ्या घालणार नाही. गोडसे संघटना काढेल अन गोळ्या घालायचे काम वाघमारे, जाधव, गायकवाड, पाटील मंडळी करतील. तेच तुरूंगात जातील, फासावर जातील. यात शंका नाही. गोडसेने गांधींना गोळ्या घातल्या म्हणून ब्राम्हणांची घरे जाळली. दाभोळकर, पानसरे मारले. आता कुणाची घरे जाळणार ? स्वत:च्याच घराला आग लावून घेणार का ?