Fri, Apr 26, 2019 20:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३३ खून करणार्‍या नव्या ‘रामन राघवन’चा पर्दाफाश

३३ खून करणार्‍या नव्या ‘रामन राघवन’चा पर्दाफाश

Published On: Sep 15 2018 2:11AM | Last Updated: Sep 15 2018 2:02AMभोपाळ : वृत्तसंस्था

अधिकाधिक पैशाच्या हव्यासापोटी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या एका टेलरने 33 पेक्षा जास्त ट्रक चालकांचा खून केल्याचे नुकतेच मध्यप्रदेश पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. आदेश खंबारा (वय 48) असे या टेलरचे नाव असून त्याने केवळ एवढ्या मोठ्या संख्येने खुनच केले असे नव्हे तर सहापेक्षा जास्त जणांचा समावेश असलेल्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीसमवेत कामही केले आहे. खून केलेल्यांमध्ये 5 जण महाराष्ट्रातील आहेत. खंबारा यास दोन आठवड्यांपूर्वी भोपाळनजीक अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

12 ऑगस्ट रोजी 50 टन लोखंडी रॉड घेवून मांदीदीप औद्योगिक क्षेत्रातून भोपाळकडे निघालेला ट्रक अचानक गायब झाला. याबाबत एका खासगी कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांना बिल्खीरीया भागात सदर ट्रकचा चालक माखनसिंग याचा मृतदेह आढळला तर 15 ऑगस्ट रोजी भोपाळच्या आयोध्यानगर भागात रिकामा ट्रक आढळून आला. यानंतर पोलिसांनी सदर लोखंडी रॉडची खरेदी-विक्री केलेल्या सात जणांना अटक केली. यावर अटक केलेल्या लोकांनी खंबारा या नावाने राहणारा जयकरण प्रजापती हा या सर्व घटनेमागचा सूत्रधार असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मांदीदीप येथून खंबारा यास अटक केली.पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच खंबारा याने आपल्या गुन्ह्यांचा पाढा वाचला. रस्त्यानजिकच्या हॉटेलमध्ये येणार्‍या ट्रकचालकांशी तो मैत्री करत असे.यानंतर जेवणातून गुंगीचे औषध दिल्यावर ट्रकचालक गाढ झोपी जात असत. यानंतर खंबारा त्यांना ट्रकमध्ये घालून दूर्गम भागात नेत असे. त्याठिकाणी ट्रकचालक तसेच त्याच्या  जोडीदाराचा तो गळा आवळून खून केल्यावर मृतदेह जंगलात फेकून देत असे. यानंतर खंबारा तसेच त्याचे साथीदार ट्रक तसेच त्यातील माल विकत असत.

अशाप्रकारे ट्रक चालक तसेच क्लिनरच्या होत असलेल्या हत्यासत्राबाबत भोपाळ पोलिसांनी इतर तीन राज्यांच्या पोलिसांनाही माहिती दिली होती. याशिवाय खंबारा याचा समावेश असलेल्या टोळीचा छडा लावण्यासाठी राज्याची पोलीस पथके बिहार, उत्तरप्रदेश तसेच मध्यप्रदेशच्या इतर भागातही रवाना करण्यात आली होती. याबाबत खंबारा याने पोलिसांना  दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक घटनेनंतर त्याला 50 हजार रुपये मिळत असत. जेव्हा तो गुन्हेगारी टोळीत सामील झाला तेव्हा पैसे मिळवणे हाच केवळ त्याचा हेतू होता. मात्र काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा अपघात झाला आणि त्याच्या उपचारासाठी त्याला मोठे कर्ज घ्यावे लागले. परिणामी कर्ज फेडण्यासाठी तो अधिकाधिक गुन्हे करु लागला. इतकेच नव्हे तर एका ठेकेदाराच्या सांगण्यावरुन त्याने एका व्यक्तीचा खूनही केला आहे. यासाठी ठेकेदाराने त्याला 25 हजार रुपये दिले होते.

सध्या पोलिसांकडून त्याने दिलेल्या माहितीवरुन त्याची उलटतपासणी घेण्यात येत आहे. सदर अटकेची माहिती मिळाली तरी खंबारा याचे मांदीदीपमध्ये एका साध्या घरात राहणारे  त्याचे नातेवाईक त्याला भेटण्यास आलेले नाहीत.