Sun, Jul 05, 2020 13:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाची लढाई अधिक बिकट होणार

कोरोनाची लढाई अधिक बिकट होणार

Last Updated: May 25 2020 1:24AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनासोबतची राज्याची लढाई यापुढे अधिक बिकट होणार असून, आता रुग्णांच्या संख्येचा जीवघेणा गुणाकार होईल. मात्र, घाबरून जाऊ नका, सरकारकडून आरोग्यसेवा निर्माण केली जात आहे, असे सांगताना आता कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. लॉकडाऊन एकदम उठवणे चुकीचे असून, हळूहळू शिथिल केला जाईल. मात्र, गर्दी झाली तर परत सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

समाजमाध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाशी राज्य सरकार कसे लढत आहे हे सांगताना, आतापर्यंत जशी रुग्णसंख्या वाढली तशीच ती पुढील काळातही वाढणार असली तरी घाबरून जाऊ नका, असा दिलासा दिला.

गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुढच्या 15 दिवसांत देशातील संसर्गाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येईल, इतपत सगळे सुरळीत करण्याची आमची इच्छा आहे. मात्र, हे करताना कोरोनाला टाळावे लागणार आहे, असे ठाकरे म्हणाले. लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला असला, तरी एकदम लॉकडाऊन करण्यासारखेच तो एकदम उठवणेही चुकीचे असल्याने हळूहळू सगळे सुरू केले जाईल. मात्र, गर्दी झाली तर पुन्हा सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. उद्योगधंदे-व्यवसाय सुरू केल्यावर शिस्त पाळली गेली नाही, तर मात्र हे सगळे पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही उद्धव यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात 70 हजार उद्योगांनी सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी 50 हजार उद्योग सुरू झाल्याचा तसेच सुमारे सहा लाख कामगार कामावर रुजू झाल्याचा दावा करताना ‘रोहयो’वरही पाच लाख मजूर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न असून, 75 ते 80 टक्के कापूस खरेदीचाही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा नाही. राज्यावरचे संकट टळणे जास्त महत्त्वाचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनासोबत जगायला शिका, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील. ईद ही कुठे गर्दी न करता, घरी प्रार्थना करून साजरी करा.

मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख रुग्णसंख्येचा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होता. 47 हजार 190 ही कोरोना रुग्णसंख्या असली, तरीही 33 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उर्वरित 13 हजारांच्या आसपास रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असेही ते म्हणाले.

रक्‍तदान करण्याचे आवाहन

राज्यात 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्‍तसाठा असून, स्वतःची पूर्ण काळजी घेऊन रक्‍तदान करा, असे आवाहन उद्धव यांनी केले. पॅकेज जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली असली, तरी गरिबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेंतर्गत पाच रुपयांत भोजन दिले, 7 ते 8 लाख मजुरांना घरी पाठवले, यासाठी कुठले पॅकेज द्यायचे? असा सवाल करत हे सरकार पोकळ घोषणा करणारे नाही, असा टोला त्यांनी लगावला. गोरगरीब, मजुरांसह लाखो लोकांना केलेल्या मदतीची जाहिरात करायची का? एस.टी.च्या माध्यमातून लाखो लोकांना 75 कोटी खर्च करून त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ सोडले यासाठी कुठले पॅकेज घोषित करायचे? असा सवालदेखील त्यांनी केला.