Mon, Jul 13, 2020 07:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त

अंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त

Published On: Jan 16 2019 11:54AM | Last Updated: Jan 16 2019 11:54AM
मुंबई : प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी सुमारे सव्वासहा कोटी रुपयांचे कोकेन वांद्रे युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी जप्त केल्याची कारवाई ताजी असतानाच रविवारी दुपारी अंधेरी येथून एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोन तस्करांना आंबोली पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी एक किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. इम्रान अब्दुल खालिद अन्सारी आणि अफजल हुसैन मुमताजअली अन्सारी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीतील विरा देसाई रोड परिसरात एमडी ड्रग्जची एक मोठी डिल होणार असल्याची माहिती रविवारी आंबोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलस आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या पथकातील रविंद्र साळुंखे, दया नायक, सावंत, नादीर, बोमटे, चव्हाण, साळवी, पाटील यांनी म्हाडा मैदानाजवळील देव प्रेस्टीज इमारतीसमोर रविवारी सकाळपासून साध्या वेशात पाळत ठेवली होती.

दुपारी पावणेतीन वाजता तिथे दोन तरुण बाईकवरुन आले. ते दोघेही कोणाची तरी वाट पाहत होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळण्याची कोणतीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना एक किलो एमडी ड्रग्जसह तीन हजार रुपयांची कॅश, युनिकॉर्न बाईक, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या असा 40 लाख 30 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल सापडला. चौकशीत या दोघांची नावे इम्रान अन्सारी आणि अफजल अन्सारी असल्याचे उघडकीस आले.

इम्रान हा वांद्रे येथील रिक्लेमेशन ट्रॉन्झिंट कॅम्प तर अफजल हा ग्रॅटरोड येथील नळबाजार, इमाम रोडवरील भन्साली इमारतीमध्ये राहतो. एमडी ड्रग्ज विक्रीचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. पहिल्याच प्रयत्नात ते दोघेही पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

ड्रग्जची तस्करी तसेच बाळगल्याप्रकरणी या दोघाविरुद्ध नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यात सायंकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.