Sun, Feb 24, 2019 02:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...आणि फातिमाच्या डोळ्यात आले अश्रू!

...आणि फातिमाच्या डोळ्यात आले अश्रू!

Published On: Oct 12 2018 12:49AM | Last Updated: Oct 12 2018 1:53AMमुंबईः

‘सहस्त्रकातील महानायक’ अशी बिरूदावली ज्यांना जगाने बहाल केली आहे त्या अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी आपला 76 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये त्यांच्यासमवेत ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख हिने प्रमुख भूमिका केली आहे. अमिताभ यांचा अभिनय पाहून मी भारावून गेले आणि माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.

‘बिग बी’ यांच्या नावाचा दबदबा किती मोठा आहे हे दुनिया जाणते. मात्र, स्वतः बच्चन यांनी कधीही सहकलाकारांवर आपल्या उपस्थितीचे दडपण येऊ दिलेले नाही. विशेषतः नवोदित कलाकारांशी तर ते अगदीच मैत्रीच्या नात्याने वागतात. त्यांच्याबाबत फातिमाने सांगितले, माझ्यासाठी प्रत्येक दिवस शिकण्याचा होता. मी पहिल्यांदा ज्यावेळी त्यांना पाहिले त्यावेळी मला बोलता येईना. मी त्यांची इतकी मोठी चाहती आहे की, साक्षात अमिताभ बच्चन समोर आहेत म्हटल्यावर मला काय बोलावे तेच सुचेना! एका सीनमध्ये आम्ही दोघे होतो आणि मला केवळ त्यांच्या संवादावर प्रतिक्रिया द्यायची होती. माझ्या चेहर्‍यावर कॅमेरा नव्हता, मात्र त्यांचा अभिनय आणि संवादफेक पाहून मी इतकी भारावले की, माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले! ते असे बोलत होते की खरोखरंच तसा प्रसंग घडत आहे आणि ते त्या भावना अनुभवत आहेत. रोज ते तितक्याच समर्पण वृत्तीने सेटवर येत असत. त्यांच्यापासून मला भरपूर शिकण्यास मिळाले.