Thu, May 28, 2020 23:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

Published On: May 16 2019 9:00AM | Last Updated: May 16 2019 9:00AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता राज्यातील विधानसभेचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरल्याने राज्यात सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्षांसाठी कसोटीचा काळ आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षामध्ये नेते आयात करण्याची स्पर्धाच लागली होती. 

त्यामुळे गचाळ कामगिरी असलेल्या चेहऱ्यांना नारळ देऊन आयात केलेल्या महत्त्वपूर्ण चेहऱ्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे काही महिन्यांसाठी कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागते आणि कोणाला डच्चू मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल. लोकसभेची राज्यातील रणधुमाळी चौथ्या टप्प्यात पूर्ण झाली होती. त्यामुळे सर्वांनाच २३ मे रोजी येणाऱ्या निकालासाठी देव पाण्यात घातले आहेत. निकाल झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे. 

राज्यात महायुतीला जनेतेने कौल दिल्यास काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपूत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. 

सुजय यांना खासदारकीला बाजी मारल्यास राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्त्वाचे खाते मिळू शकते. गिरीश बापट यांना लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने त्यांच्याकडील खाती नव्या चेहऱ्यांकडे दिली जाऊ शकतात.