Fri, Sep 20, 2019 21:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभा २०१९ : प्रिया दत्त यांचा पत्ता कट; नगमांना संधी?

लोकसभा २०१९ : प्रिया दत्त यांचा पत्ता कट; नगमांना संधी?

Published On: Oct 02 2018 10:32AM | Last Updated: Oct 02 2018 10:29AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

दिग्गज नेते दिवंगत सुनील दत्त यांच्या कन्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेस पक्षाने सचिव पदावरून काढून टाकले आहे. पक्षात निष्‍क्रीय राहिल्याचा त्यांना फटका बसल्याचे मानले जात आहे. आता मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून २०१९ मध्ये प्रिया यांच्या ऐवजी अभिनेत्री नगमा यांना काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. नगमा यांनी पक्षासाठी उत्तर प्रदेशपासून राजस्‍थान आणि कर्नाटकातही रोड शो केले आहेत. 

रविवारी सांताक्रूज येथे उत्तर-मध्य मतदारसंघांची बैठक झाली. यामध्ये नगमा सहभागी झाल्याने या कयासाला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. एका ज्येष्‍ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, या मतदार संघातून प्रिया दत्तच मुख्य दावेदार आहेत. परंतु, त्यांना सचिव पदावरून हटवल्याने यावेळी दुसर्‍या नावाचाही विचार होऊ शकतो. 

प्रिया दत्त दोनदा खासदार

प्रिया दत्त या उत्तर-मध्य मुंबईतून २००४ आणि २००९ असे दोनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया यांना भाजपच्या पुनम महाजन यांच्याकडून धक्‍कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रिया यांना वडील सुनील दत्त यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे मतदार संघात त्यांचा मोठा पाठिराखा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही त्या येथून पक्षाच्या वतीने प्रबळ दावेदार असणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. 

उत्तर-पश्चिम मुंबईतूनही नगमा यांच्या नावाची चर्चा

दुसर्‍या एका काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले की, नगमा उत्तर-मध्य ऐवजी उत्तर-पश्चिम मुंबईतूनही काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरू शकतात. ही जागा काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांची आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नगमा या जागेवरून २००९ च्या निवडणुकीतच उतरणार होत्या परंतु शेवटच्या क्षणी तिकीट कामत यांना मिळाले. त्यामुळे जर दत्त यांना पुन्‍हा उत्तर-मध्यची उमेदवारी मिळाली तर नगमा यांना उत्तर-पश्चिम मधून मैदानात उतरवले जाईल. 

नगमा यांनी शक्यता नाकारली

नगमा या सध्या जम्‍मू काश्‍मीर आणि पदुच्‍चेरी येथे ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव आहेत. त्यांनी प्रिया दत्त यांच्या जागी उमेदवारी मिळण्याच्या चर्चा फेटाळल्या. त्यांनी सांगितले की, केवळ प्रोटोकॉल म्‍हणून मी रविवारच्या बैठकीत सहभागी झाले. महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांना त्यांच्या मतदारसंघात बैठकीत सहभागी होण्याचा पक्षादेश होता. त्यानुसार मी उत्तर-मध्य मुंबईत राहत असल्याने येथील बैठकीत सहभागी झाले. 

नगमा पक्षश्रेष्‍ठींच्या जवळच्या?

काँग्रेसचे पक्षश्रेष्‍ठीच कोणी कुठून निवडणूक लढवायचे हे ठरवतील, असे नगमा म्‍हणाल्या. दरम्यान, नगमा या पक्षश्रेष्‍ठींच्या जवळच्या मानल्या जात आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणूक त्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून लढवली होती. परंतु, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय त्या तामिळनाडू आणि बिहारमध्ये त्या पक्षाच्या प्रभारीही राहिल्या आहेत. 

प्रिया दत्त यांच्या समर्थकांतून नाराजी

माजी खासदार प्रिया दत्त यांना अचानक सचिव पदावरून हटवल्याने समर्थकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. सोमवारी दत्त यांनी समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांनी ट्विट करून म्‍हटले आहे की, "जर कोणी एखादा व्यक्‍तीच पदावर कायम राहिल्यास इतर उमेदवारांनी कुठे जायचे? यात नाराज होण्यासारखे काही नसून यामुळे नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे."

राजकीय निष्क्रियतेमुळे कारवाई?

काँग्रेसेच्या पक्षांतर्गत सूत्रांनुसार, प्रिया यांना पदावरून हटवण्याचे मुख्य कारण त्यांची राजकीय निष्क्रियता हे आहे. २०१४ मध्ये निवडणूक हारल्यानंतर पक्षाने त्यांना सचिव आणि माध्यम प्रभारी म्‍हणून जबाबदारी दिली. परंतु, त्यांनी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही. त्यातच दुसर्‍या एका नेत्याने सांगितले की, गेल्या महिन्यात पक्षाने पुकारलेल्या भारत बंद मध्ये दत्त या मुंबईपासून लांब राहिल्या. 

►प्रिया दत्त यांना सचिवपदावरून हटवले

तसेच दत्त यांचे माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार नसीम खान आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर यांच्याशीही संबंध चांगले नाहीत, असे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी प्रिया यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यांनतर चिंता व्यक्‍त केली होती. तेव्‍हा काँग्रेसच काँग्रेसला मागे खेचत असल्याचे त्यांचे म्‍हणणे पक्षश्रेष्‍ठींना रुचले नसावे. 

तयारी करून पुन्‍हा मैदानात उतरणार

दरम्यान प्रिया यांनी सर्व दावे फेटाळले आहेत. पक्षाच्या सचिव पदावरू हटवण्यात भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा काहीही संबंध नाही, असे दत्त म्‍हणाल्या. मी खूप काळापासून पक्षाशी एकनिष्‍ठ असून पुन्‍हा निवडणूक लढणार आहे. त्यासाठी मी पुन्‍हा तयारी सुरू करणार असल्याचे दत्त यांनी सांगितले. विशेष म्‍हणजे प्रिया दत्त यांच्यावर अद्याप पक्षाने कोणतीही नवी जबाबदारी सोपवलेली नाही.